मेहरुन नाकाडे -रत्नागिरी --शासकीय कारभार पारदर्शी करण्यासाठी सर्व कार्यालये संगणकीकृत करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ग्राहकवर्गही आता हायटेक होऊ लागला आहे. केवळ वीज बिल भरण्याबाबतच हा मोठा फरक लक्षात येऊ लागला आहे. तासन्तास रांगेत उभे राहण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटव्दारे बिल भरण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यातून कोकण परिमंडलास दहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.घरोघरी संगणक नसले तरी स्मार्ट फोन उपलब्ध आहेत. मोबाईलव्दारे इंटरनेटमुळे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. गेल्या पाच महिन्यांचा आढावा घेता रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९०२५९ ग्राहकांनी आॅनलाईन सेवेचा लाभ घेत १० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून ४७ हजार २१ ग्राहकांनी ६ कोटी ७१ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५३ हजार ८२४ ग्राहकांनी आॅनलाईन सेवेचा लाभ घेत ३ कोटी ३० लाख रूपये भरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा महसूल निम्मा असला तरी लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मात्र अधिक आहे.कोकण परिमंडलातून जुलै महिन्यात २१ हजार ८५९ ग्राहकांनी आॅनलाईन सेवेव्दारे २ कोटी २० लाख, आॅगस्टमध्ये २२ हजार ३२३ ग्राहकांनी २ कोटी २५ लाख, सप्टेंबरमध्ये २१ हजार ९२३ ग्राहकांनी २ कोटी ९५ लाख आॅक्टोबर महिन्यात २४ हजार १५४ ग्राहकांनी २ कोटी २१ लाख, तर २० नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून १ कोटी ४ लाख मिळून सुमारे १० कोटीचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागातून जुलै ते आॅक्टोबरअखेर १२८७३ ग्राहकांनी १ कोटी ४१ लाख ९२ हजार ५७० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे. खेड विभागातून ८७१५ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेत १ कोटी २६ लाख ४३ हजार ४०० रूपये भरले आहेत. रत्नागिरी विभागातून २५,३९४ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेत २ कोटी ६२ लाख ९७ हजार १४० रूपयांचा महसूल भरला आहे. रत्नागिरी विभागातून आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांना आवाहन ग्राहकांच्या सुविधेसाठी आॅनलाईन वीजबिल सुविधा सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील मंडळींबरोबर ज्याच्याकडे संगणक उपलब्ध नसतील त्यांना महाआॅनलाईनव्दारे वीजबिल भरणे सुलभ होणार आहे. महावितरणने रत्नागिरी जिल्ह्यात महाआॅनलाईनची (महा-ई सेवा केंद्र) ९० केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. याठिकाणी ग्राहकांना विनाशुल्क वीजबिल भरता येते. परंतु वीजबिल भरल्यानंतर महावितरणची पक्की पावती केंद्र चालकाकडून घेणे क्रमप्राप्त आहे. केंद्रचालक पावती देण्यास टाळाटाळ करीत असेल किंवा शुल्क आकारणी करीत असेल तर ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. - एस. पी. नागटिळक, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.
ग्राहकही होताहेत ‘हायटेक’
By admin | Published: December 01, 2014 9:26 PM