नाजूक चणीच्या गोऱ्या शिडशिडीत सावंत बाई खांद्यावर पदर घट्ट लपेटून तुरुतुरु चालत जेव्हा शाळेच्या प्रांगणात प्रवेश करत तेव्हा सौंदर्य आणि शालिनता यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळे. गद्यापेक्षा पद्य पाठ बाई उत्तम शिकवत. बाईंनी शिकवलेल्या कितीतरी कविता आजही तोंडपाठ आहेत. ‘मला आवडते वाट वळणाची’ ही कविता अगदी समरसून शिकवणाऱ्या आमच्या लाडक्या बाई आम्ही कॉलेजमध्ये असताना एका दुर्धर आजाराने जीवनप्रवासाच्या एका अवघड वळणावर कायमच्या दिसेनाशा झाल्या.
पाचवी ते सातवी असे तिन्ही वर्गांमध्ये इतिहास शिकवणारे आमचे मोहन सर एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हते. उंच, गहूवर्णीय, राजबिंडे मर्दानी रूप लाभलेले, देव आनंदसारखा केसांचा आकर्षक कोंबडा काढलेले मोहन सर आपल्या ऐटबाज तिरप्या चालीत वर्गात प्रवेश करत असत. वर्गात आल्याआल्या मुलांना उद्देशून ‘बच्चे लोग’ अशी आपुलकीची आरोळी ते ठोकत असत, ज्यामुळे त्यांच्यामधील आणि मुलांमधील दुरावा आपोआप संपत असे.
सावंत बाई आणि मोहन सरांच्या तासाला हसता खेळता असलेला आमचा वर्ग इंग्रजीच्या जाधव सरांना मात्र जाम टरकून असायचा. पावसाळ्यात सर गुडघ्यापर्यंत येणारे गमबूट घालून खाडखाड आवाज करत वर्गात यायचे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आली नाहीत तर बदडूनही काढायचे. काही मोठ्या मुली केसांना पिना लावून येत असत. मुलींना डोक्यावर मारताना या पिना सरांच्या हाताला टोचत असत. आधीच वैतागलेले सर त्यामुळे आणखीच चिडायचे.
भरपूर अवांतर वाचनाची आवड असणारे धनगर सर आठवीत असताना मराठी विषयाला आले. त्यामुळे पाठ्यपुस्तकाबाहेरीलसुद्धा बरंच काही कानावर पडू लागलं. अगदी ‘एकच प्याला’मधील सुधाकर-सिंधूचा संवादही सर आमच्याकडून करवून घेत असत.
इथेच मराठी साहित्य वाचनाला खतपाणी मिळत गेले. मलनावर असे थोडे विचित्र आडनावाचे कानडी मुलखातील सर विज्ञान विषयाला आले. सर अतिशय उत्तम शिकवत. सर शिकवत असतानाच बराच पाठ्यभाग लक्षात राहत असे. एक धडा झाला की सर उजळणी घ्यायचे. त्यामुळे नियमित अभ्यासाची सवय लागली. सर जेवढे चांगले शिकवत तेवढे शिक्षाही कडक करत असत.
नववी-दहावीला पटाडे सर विज्ञान घेऊ लागले. सर अध्यापनात प्रयोग व विविध कृतींचा समावेश करत असत. त्या आधी मानवी सांगाड्याच्या भीतीने प्रयोगशाळेच्या वाऱ्यालाही कधी उभे न राहिलेले आम्ही आता मात्र प्रयोगशाळेत जायला उत्सुक असायचो. प्रयोगशाळेत तयार केलेल्या हायड्रोजन सल्फाईडचा कुजक्या अंड्यासारखा वास आजही नाकात रेंगाळतो आहे. चुंबकाचे आकर्षण आणि प्रतिकर्षण पाहतानाचे डोळ्यात न मावणारे नवल आजही तसेच आहे. सरांकडून मिळालेल्या या अध्यापनाच्या हातोटीमुळेच की काय मीही जेव्हा विज्ञान पदवीधर शिक्षिका म्हणून शाळा लांजा क्रमांक ५ येथे रुजू झाले, तेव्हा स्वखर्चाने प्रयोग साहित्य आणून अध्यापनात प्रयोगांचा समावेश केला.
इतर शिक्षकांसारखं स्टाफ रूममध्ये न बसता, जाळीदार स्वतंत्र केबिनमध्ये बसणारे लाड सर नववीपासून भूगोल शिकवायला आले आणि खरंच भूगोल विषयही आवडीचा होऊ शकतो, हे त्यांच्या उत्तम हातोटीमुळे समजलं. अतिशय हुशार आणि उत्साही असलेले गणिताचे काजरेकर सर आम्हाला नववीला वर्गशिक्षक म्हणून लाभले आणि बैजिक राशी, एकसामाईक समिकरणे, भूमितीतील प्रमेये यांच्याशी गट्टी जमली.
प्रत्येक शिक्षकांकडून कोणता ना कोणता गुण घेतानाच मी माझ्या शाळेकडूनही काही गोष्टी शिकले. विविध दिनांक औचित्य साधून शाळेत निबंध, वक्तृत्व, चित्रकला, कथाकथन इ. स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. बाबांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे या प्रत्येक स्पर्धेत आम्ही भाग घेत असू. हाच वारसा चालवताना मी आज एक शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. एकूणच एक व्यक्ती म्हणून आणि एक शिक्षिका म्हणूनही माझ्या जडणघडणीत माझ्या सर्व शिक्षकांचा पयार्याने माझ्या हायस्कूलचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
- वैशाली कदम, लांजा