खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खोपी फाट्यापासून भोस्ते घाटातील पायथ्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. घाटातील मार्गाचे रुंदीकरण करताना करण्यात आलेल्या डोंगराच्या कटींगमुळे दरडी कोसळण्याचे संकट असून, याठिकाणी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
खोपी फाटा येथील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदार कंपनीने अद्यापही ठोस पावले न उचलल्याने वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भरणे येथील सर्व्हिस रोडच्या दैनावस्थेमुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ठेकेदार कंपनीला हा मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी सवड मिळाली आहे. भरणे जगबुडी पुलापासून भोस्ते घाटापर्यंत दुहेरी मार्गाचे काम अर्धवट आहे.
खेड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी वेरळ येथील सर्व्हिस रोडचीही दुरवस्थाच झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वेरळ येथे मध्यवर्ती ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. ठेकेदार कंपनीकडून खड्डे बुजविण्यासाठी केवळ मलमपट्टीच केली जात असल्याने बुजविलेले खड्डे पुन्हा उखडत आहेत. भोस्ते घाटातील काही मार्गावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसात खड्ड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे अंदाजच येत नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे.