शहरात नाले तुंबल्याने इमारतींत पाणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : ताेक्ते चक्रीवादळाचा महामार्गाच्या यंत्रणेलाही मोठा फटका बसला. या वादळात झालेल्या अतिवृष्टीमुळे परशुराम घाटात भरावाची माती रस्त्यावर घसरून महामार्ग चिखलमय झाला. त्यामुळे हा महामार्ग सोमवारी सकाळी काही तास ठप्प होता. त्यातच शहरी भागात नाले तुंबल्याने काही इमारतींमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने ताैउते चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर येथील प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी महामार्गासह अन्य यंत्रणेलाही संतर्कतेचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्या-त्या विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. महामार्गावर चिखल आल्यास किंवा वृक्ष कोसळल्यास ते तत्काळ हटविण्यासाठी जेसीबी व अन्य यंत्रणा तैनात करण्यात आली होती. अशातच रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढल्याने त्याचा मोठा फटका महामार्गाला बसला.
परशुराम येथील स्वागत कमानीपासून जवळच असलेला भराव रस्त्यावर वाहून आला. तसेच हॉटेल ओमेगा इनसमोरील डोंगराची माती महामार्गावर आल्याने हा रस्ता चिखलमय बनला होता. सुरुवातीला काही वाहने यामध्ये अडकली होती. मात्र, त्यानंतर तातडीने येथे जेसीबी नेऊन रस्त्यावर आलेला चिखल हटविण्यात आला.
शहर हद्दीतील बहादूरशेख नाका ते पाग नाका परिसरात जागोजागी पावसाचे पाणी साचले होते. तसेच मोऱ्या तुंंबल्याने काही ठिकाणी रस्त्यालगत तलावाचे स्वरूप आले होते. साचलेले पाणी महामार्गावरून वाहून गेल्याने पलीकडील इमारतींमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार घडले. येथील रिगल हॉटेल शेजारील हाफिजा मंजील इमारतीतील गाळ्यांमध्ये पाणी शिरले होते.
तालुक्यातील पेढे बौद्धवाडी येथेही डोगरांची माती आली. ही माती नाल्यांमध्ये गेल्याने नाले तुंबले होते. काहींच्या घरातही माती जाण्याचा प्रकार घडला. गेल्या वर्षी देखील याच वाडीत अशा पद्धतीने डोंगराची माती घरात येण्याचा प्रकार घडला होता.
-----------------------
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात रस्त्यावर चिखल आल्याने अनेक वाहनांना फटका बसला.