आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने सुरु झाले आहे. त्यातच आता पाऊस सुरु असल्याने कामात अधिकच खंड पडला आहे. भरणे येथील सर्व्हीस रस्ते व ओव्हरब्रीजचे काम बंद ठेवल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना फार मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
टीम तैनात
चिपळूण : अतिवृष्टी आणि त्यातच कोरोना चाचणीची टांगती तलवार यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या मुंबईकरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुका आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ग्रामीण भागात १३० तर शहरात ४ अशा १३४ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
योजनांसाठी कमिट्या
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने राज्यभरात समर्थ बुथ अभियान राबवले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात ८५२पैकी ६८८ बुथ कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांच्या अध्यक्षांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
नळपाणी योजनेचा प्रारंभ
लांजा : शहरातील प्रभाग क्रमांक २ ते ६ मधील नळपाणी पुरवठा योजना, डॉ. सप्रे यांचे घर ते वैभव वसाहत या मार्गावरील पाईपलाईनच्या कामाचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.
शिक्षकांचा गौरव
मंडणगड : शिक्षक दिनानिमित्त मंडणगड तालुका विकास मंडळ, मुंबई संचलित शाळांमधील तीन शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. क्रीडाशिक्षक मनोज चव्हाण, किशोर कासारे आणि लाटवण विद्यालयाचे शिक्षक राजेश इंगळे या तीन शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संतसेना महाराज जयंती
दापोली : तालुका नाभिक समाजाच्यावतीने श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. श्री संतसेना महाराज यांच्या जीवनावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कार्याची माहिती दिली.
जीवनावश्यक वस्तू वाटप
देवरुख : शिक्षक दिनानिमित्त प्रकाश कांबळे यांनी गरजू व्यक्तींना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आपल्या कन्येच्या नामकरणाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबवला. लॉकडाऊन काळात मोलमजुरी करणाऱ्या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे अशांना प्रकाश कांबळे यांनी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
दरड कोसळली
दापोली : तालुक्यातील दापोली - बुरोंडी या मुख्य मार्गावर चंद्रनगर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील एस. टी. बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्तेही खचले आहेत. पूरपरिस्थितीमुळे अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने नुकसान झाले आहे.
सुरक्षेसाठी पेंडॉल
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाच ठिकाणी पेंडॉल तयार करुन त्याठिकाणी आरोग्य व सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे. येत्या एक-दोन दिवसात महामार्गावरील खड्डे भरणे, रिफ्लेक्टर लावणे, वाढलेली झाडी आणि गवत कापणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
वाळू वाहतुकीवर बंदी
रत्नागिरी : ८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत महामार्गावर वाळू, रेती व तत्सम खनिज वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. तसेच ८ सप्टेंबर रोजी रात्रीपासून मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतही अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.