चिपळूण : येथील किंडरलैंड प्रिस्कूलमध्ये होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी डॉ. कांचन मदार व डब्लू. एस. डब्लू.च्या सदस्या अंजली चव्हाण उपस्थित होत्या. यानिमित्ताने पालखीची मिरवणूक काढण्यात आली. फुलांची, रंगांची उधळण करुन साध्या पध्दतीने होळी साजरी केली.
अभिनय कार्यशाळा
दापोली : फणसू येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे नाट्य अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रपट निर्माता प्रविणकुमार भारदे यांनी विद्यार्थ्यांना नेपथ्य, दिग्दर्शन, रंगमंच सजावट, वेशभूषा व प्रत्यक्ष अभिनय या विषयी विनामोबदला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला फणसू गाव अध्यक्ष किशोर सुर्वे, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षणतज्ज्ञ किशोर शिगवण, शाळा समन्वय समिती अध्यक्ष संतोष करंजकर उपस्थित होते.
संगणक कक्ष उद्घाटन
खेड : भरणे येथील नवभारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या संगणक संच व कक्षाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वीच्या सुमारे २५०० गरजू विद्यार्थ्यांना संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कार्यक्रमप्रसंगी संस्था सचिव ॲड. तु. ल. डफळे, सहसचिव दत्तात्रय धुमक उपस्थित होते.
१५ विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात
खेड : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अन्य जिल्ह्यातून काही कुटुंबे तालुक्यातील विविध गावांमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शासन आदेशानुसार तालुक्यात सलग १० दिवस शाळाबाह्य शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत १५ शाळाबाह्य विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात दाखल झाले आहेत.
विक्रेत्या महिलेचा प्रामाणिकपणा
गुहागर : शृंगारतळीत खरेदीसाठी आलेल्या एका व्यक्तीचे ५ हजार रूपये असलेले पाकीट व इतर वस्तू एका बांगडी विक्रेत्या महिलेला सापडल्या व तिने त्या प्रामाणिकपणे शेजारच्या पोलीस चौकीत नेऊन दिल्या. याचदरम्यान तेथे तक्रार करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला हे पाकीट तिच्याच हस्ते देऊन पोलिसांनी या महिलेचे कौतुक केले.
श्रेयस तांबेला सुवर्णपदक
खेड : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेचे व्यवस्थापक नीलेश तांबे यांचे चिरंजीव श्रेयस याने एस. ओ. एफ. राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत प्रशालेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने झोनमध्ये २७७ वा, रिजनमध्ये ४३३ वा, तर जागतिक स्तरावर ५८३ वा क्रमांक पटकावला. यापूर्वीही त्याने होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत प्रथम श्रेणी, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात २० वा व जिल्ह्यात १० वा क्रमांक मिळवला होता.
चोरवणे हायस्कूलचे यश
खेड : तालुक्यातील चोरवणे शारदा विहार माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले. अनुष्का शिंदे हिने ६७,३६ टक्के तर श्रृतिका जाधव हिने ६३.८८ टक्के गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेकडून कौतुक करण्यात आले आहे.