रत्नागिरी : शनिवारपासून सलग तीन दिवस सरकारी कार्यालयांना सुट्ट्या असल्या, तरी या कार्यालयांना आर्थिक वर्ष संपत असल्याने उद्दिष्टपूर्ती, खर्चाची जुळवाजुळव आणि अन्य कामे आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयांना अधिकृत सुट्टी असूनही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुख, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे सुट्टी असली, तरी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिमगा असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत असल्याने सरकारी कार्यालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे ३१ मार्चला पूर्ण होतात. शासनाकडून विविध शिर्षकांतर्गत आलेला सर्व निधी हा संपलाच पाहिजे. तो परत जाता कामा नये, अशी सूचना मिळालेली असल्याने जिल्हा परिषदेच्या कार्यालयात निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
विविध विभागांना उद्दिष्ट देण्यात आलेले असून, ते मार्चअखेर पूर्ण करावयाचे आहे. जिल्हा परिषदेत आलेला निधी परत जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १०० टक्के खर्च नसल्याने निधी अधिकाधिक खर्ची पडावा, यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. मार्च संपण्यास केवळ ५ दिवस बाकी असताना, शनिवापासून सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. यात धुलिवंदन, चौथ्या शनिवार, रविवार असे तीन दिवस सुट्टी आल्याने प्रत्यक्ष कामकाजासाठी मंगळवारपासून केवळ दोनच दिवस मिळणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या शनिवार, रविवार आणि साेमवार या सुट्ट्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे खातेप्रमुखांसह सर्वच कर्मचाऱ्यांची सुट्टी असतानाही ते परिषद भवनात उपस्थित राहतील.