खेड : धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवासी महिलेचा तोल गेला आणि रेल्वे स्थानकातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु स्थानकात गणपती उत्सवाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड जवानांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेचा जीव वाचवला. बुधवारी ११ सप्टेंबर रोजी हा थरार खेड रेल्वे स्थानकात घडला. या घटनेत प्रसंगावधान राखून महिलेचा जीव वाचवणाऱ्या या होमगार्ड जवानांच्या साहसाचे कौतुक होत आहे.सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मणचे मुटाट या गावातील रहिवासी रिद्धी गणेश पाळेकर या बुधवार ११ रोजी दादर - सावंतवाडी या रेल्वेतून प्रवास करत होत्या. रेल्वे खेड स्थानकात रात्री १०.४८ वाजण्याच्या सुमारास थांबली असता पाळेकर या फलाटावर उतरल्या होत्या. परंतु गाडी सुटत असताना त्यांनी त्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाय घसरल्याने फलाट व गाडी यामध्ये त्यांचा पाय अडकला.
हा प्रकार खेड स्थानकात कर्तव्यावर असलेले होमगार्ड जवान व खेड पथकाचे तालुका समदेशक अधिकारी संजय कडू, जवान उदय मोरे, जनार्दन पाष्टे, रेल्वे पोलीस जवान तेजपाल सिह यांनी पाहिला.महिलेचा जीव धोक्यात असल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न लावता स्वत: चा जीवाची पर्वा न करता होमगार्ड जवान संजय कडू व अन्य सहकाऱ्यांनी त्या महिलेला सावधपणे सुरक्षित बाहेर काढले व तिचे प्राण वाचवले. या अपघातात महिलेच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तसेच होमगार्ड जवान कडू याना देखील किरकोळ दुखापत झाली.
पाळेकर यांच्यावर उपचार करून त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस निरीक्षक दीपक बबेरवाल, संजय निकम, खेड रेल्वे स्थानक प्रमुख मनीषा तटकरी यांनी व प्रवाशांनी होमगार्ड जवान व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी पाळेकर यांनी देखील त्यांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांचे आभार व्यक्त केले.