लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे गेली दोन वर्षे उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. शिवाय इंधन दरातील वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्याचे दर कडाडले आहेत. बँकांचे गृहकर्ज दर सर्वत्र सारखे आहेत. सरकारी बँकांमध्ये ६.७० टक्के दराने गृहकर्ज आकारले जात असून, खासगी बँका, वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे दर मात्र ८ ते ११ टक्के आहेत. गृहकर्ज कमी दरात उपलब्ध असले तर बांधकाम साहित्य मात्र महागले आहे. याचा परिणाम घरांच्या किमतीवर झाला आहे.
शहर व लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील घरांच्या किमतीत फरक आहे. गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे स्टील उद्योगासाठी भासणारी ऑक्सिजनची कमतरता, सर्वच व्यवसायांना मनुष्यबळाची भेडसावणारी समस्या, वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्चातील वाढ यामुळे घरांचे दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. बँकांनी गृह कर्जाचे दर कमी केले असले तरी सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न अद्याप दूरच आहे.
कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम
स्टील उद्योगासाठी लागणारा ऑक्सिजन, मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध होत नाही, वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच स्टीलच्या दरात वाढ झाली आहे. कोराेनामुळे शासकीय निर्बंध असल्याने उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. साहित्याची कमतरता भासत असून दरातही वाढ झाली आहे.
- प्रवीण मलुष्टे, व्यावसायिक
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ
गेल्या वर्षभरात इंधन दरात कमालीची वाढ झाल्यानेच वाहतूक खर्च वाढला आहे. शिवाय कोरोनामुळे सलग दोन वर्षे लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले. मनुष्यबळच उपलब्ध होत नसल्याने व्यवसाय ठप्प आहेत. वाढत्या महागाईमुळे मजुरीचेही दर वाढले असल्याने सर्व गोष्टीचा परिणाम साहित्य विक्रीवर झाला आहे.
- साैरभ मलुष्टे, व्यावसायिक
राष्ट्रीयीकृत बँका असो वा खासगी बँकांच्या गृहकर्जाचे दर सारखे आहेत. वित्तीय संस्थांचे दर मात्र अधिक आहेत. परंतु घरांच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. कोरोनाचे संकट असतानाच महागाईनेही राैद्र रूप धारण केले आहे. शहर किंवा ग्रामपंचायत हद्दीतील घरांच्या किमतीत कमालीचा फरक आहे. दराचा विचार केला तर शहरात येण्यासाठी वाहतूक खर्च वाढत आहे.
- एस. जे. पिलनकर, रत्नागिरी
महागाईचा परिणाम बांधकाम साहित्याच्या दरावर झाला आहे. महागाईचे कारण घरांच्या वाढत्या किमतीसाठी सांगितले जात आहे. एकीकडे बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले असले तरी महागाईमुळे घर घेणे परवडणारे नाही. बांधकाम साहित्याचे दर वाढले की घराचे दर वाढतात. दरावर निर्बंध असणे गरजेचे आहे. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे.
- आर. व्ही. जाधव, रत्नागिरी
गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग
शहरामध्ये ३५०० ते ५००० रुपये चाैरस मीटर दराने घरांचे दर आकारले जातात. शहराबाहेर मात्र २५०० ते ३००० चाैरस मीटर दर आकारला जातो. शहर व ग्रामपंचायत हद्दीतील दरात कमालीचा फरक पडतो.
शहरापासून पाच ते सात किलोमीटर पर्यंत अंतरावर ग्रामपंचायत हद्दीतील दर वेगळे असले तरी अंतरामुळे येण्या-जाण्याचा खर्च वाढतो.
शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, दवाखाने आदी कारणासाठी शहरात जावे लागत असल्याने शहरापासून दूर घर घेतले तर सातत्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ६.७०
बँक ऑफ इंडिया ६.७०
बँक ऑफ महाराष्ट्र ६.७०
एचडीएफसी ६.७०
आयसीआयसीआय ६.७०