रत्नागिरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर आले आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला मार्च २०१९पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवायची आहे. त्यामुळे यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल समोर यावा, या दृष्टीने केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी भारतीय टपाल विभागाकडे ही जबाबदारी दिली आहे. दळणवळणाचे प्रमुख साधन असलेला आणि संदेशाचे वहन करणारा प्रमुख विभाग म्हणून टपाल विभागाकडे पाहिले जाते.
ब्रिटीश काळात सुरू झालेल्या या विभागाने अगदी ग्रामीण भागातील जनतेशी एक वेगळे विश्वासाचे आणि सेवेचे नाते जोडले. हे नाते आत्तापर्यंत टिकून आहे. पोस्टाची जिल्ह्यात ५८४ ग्रामीण कार्यालये आहेत. तर ७७ उपकार्यालये आहेत. रत्नागिरी आणि चिपळूण येथे मुख्य कार्यालय (प्रधान डाकघर) आहे. पोस्टमन प्रत्येक गावातील घरात पोहोचला
आहे.
ग्रामीण भागातील जनतेशी पोस्टाने जोडलेली नाळ लक्षात घेऊन केंद्रीय ऊर्जा विभागाने अद्याप वीज पोहोचलेली नाही, अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. यासाठी पोस्ट विभागाला जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते.
प्रत्येक गावातील सर्वेक्षणाची जबाबदारी त्या भागातील टपाल कार्यालयाकडे देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण पोस्ट कार्यालयांकडून जलदगतीने काम झाल्याने हे सर्वेक्षण १४ नोव्हेंबरलाच पूर्ण झाले.
जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्याप वीज नसल्याचे दिसून आले तर २५ घरांचा पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.
स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे उलटून गेली तरी अजूनही जनता रस्ता, वीज यासारख्या सुविधांपासून वंचित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, आता ऊर्जा विभागाने मार्च २०१९पर्यंत सर्व घरांना वीज देण्याची घोषणा केल्याने आता या घरांमध्ये मार्चपूर्वी प्रकाश पसरेल, अशी आशा आता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.
वर्षानुवर्षे वीज नसल्याने अंधारात राहात असलेल्या जिल्ह्यतील या ५,९५१ घरांपैकी २,९७३ कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील तर २,९५३ कुटुंबे दारिद्र्यरेषेवरील आहेत. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण झालेले
नाही. या कुटुंबांना २०१९पर्यंत वीज मिळेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १,५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्यापही वीज नसल्याचे दिसून आले. टपाल खात्याच्या सर्व्हेक्षणातील जिल्ह्याची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.