जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे धनगरवाडीचा ‘एक वाडी, एक बाप्पा’ सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णांना अथक सेवा देणाऱ्या सर्व डाॅक्टरांचा सत्कार्य सेवा मंडळाच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. तसेच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही गाैरविण्यात आले.
भाऊराव पाटील जयंती
मंडणगड : येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ. सुभाष सावंत होते. डाॅ. सावंत यांनी भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
मोकाट जनावरांनी केले त्रस्त
रत्नागिरी : नगर परिषदेकडून मोकाट जनावरे आणि श्वान यांचा बंदोबस्त अद्याप झालेला नसल्याने या जनावरांचा त्रास शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. मध्यंतरी नगर परिषदेने श्वानांचा बंदोबस्त चार दिवसांत करण्याची घोषणा केली होती. मात्र, ती केवळ घोषणाच ठरली आहे.
महाविद्यालयात कार्यक्रम
देवरूख : येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आंतरराष्ट्रीय शांंतता दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. प्रा. मयुरेश राणे आणि प्रा. धनंजय दळवी यांनीही मार्गदर्शन केले.
योगासनावर मार्गदर्शन
मंडणगड : येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात याेग व योगासने याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व यावर या कार्यक्रमाचे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक तळेघर येथील योगाशिक्षक दिनेश पेडणेकर होते. विद्यार्थ्यांनी योगीता पेडणेकर हिने प्रात्यक्षिक केले.