मोरी खचली
देवरूख : गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, पावसामुळे संगमेश्वर नायरी मार्गावरील फणसवणे जाखमता मंदिराजवळची मोरी खचून भगदाड पडले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रस्त्याच्या मध्येच भगदाड पडल्याने चारचाकी वाहन जाणे अशक्य बनले आहे.
लेखी परीक्षा
खेड : वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीतर्फे शिवशंभू स्वराज्य लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली असून, पाच वर्षे ते शंभर वर्षे वयाची व्यक्ती त्यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समितीचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी चिन्मय गुरव यांनी केले आहे.
कालिदास दिन साजरा
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे कालिदास दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. ‘मला भावलेले कालिदासाचे रघुवंश’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी सुश्रुत चितळे याने मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रफुल्ल कुलकर्णी, विभागप्रमुख डाॅ. कल्पना आठल्ये यांनीही मनोगते व्यक्त केली.
वेदांग कुलावकरचे यश
रत्नागिरी : येथील पटवर्धन हायस्कूलचा विद्यार्थी वेदांग नितीन कुलावकर याने बीडीएस परीक्षेत सुवर्ण पदक पटकावले आहे. जूनमध्ये प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सहावीच्या ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशीप परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवित सुवर्णपदक पटकावले.
अलोरेत खड्डे भरले
चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथील रस्त्यावर खड्डे पडले असून, अलोरेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व विद्यार्थी संघटनेने खड्डे बुजविले आहेत. अलोरे मोहोल्ला व स्वयंभू मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यामुळे पावसाळ्यात येता-जाता वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे.
डाॅ. प्रसाद करमरकर यांचा सत्कार
दापोली : तालुक्यातील जालगाव येथील सेवाभावी वृत्तीचे गरिबांचे डाॅक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डाॅ. प्रसाद करमरकर यांचा जालगाव कुंभारवाडीतर्फे नुकताच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनाकाळात दिलेल्या सेवेची दखल घेत सत्कार करण्यात आला.
खड्डे बुजविण्याचा इशारा
रत्नागिरी : नगर परिषदेच्या हद्दीत केलेले खोदकाम व खड्डे पडलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण येत्या आठ दिवसात तातडीने करावे. हे खड्डे भरण्याविषयी योग्य ती उपाययोजना करावी. या मुदतीत कोणतीही उपाययोजना न केल्यास आपण खड्डे बुजविणार असल्याचा इशारा भाजपाचे जिल्हा (दक्षिण) सचिव ॲड. महेंद्र मांडवकर यांनी दिला आहे.
हळद लागवड प्रात्यक्षिक
चिपळूण : सावर्डे येथे हळद, आले लागवड, पीक लागवड प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम यांनी प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. मशागत, खत व्यवस्थापन, पिकांची काढणी, कीडरोग व्यवस्थापन आदि माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.
अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विधी अधिकारी कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी हे पद खुल्या वर्गातून कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता २४ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.