दुरूस्तीची मागणी
गुहागर : तालुक्यातील काैंढरकाळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरून वाहत असते. या पुलाची दुरूस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता सलोनी निकम यांना मनसेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
दिव्यांगाचे आज लसीकरण
चिपळूण : नगर परिषद हद्दीतील १८ वर्षांवरील दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असून, शहरातील दिव्यांगांनी सोमवार, दि. २८ जून रोजी सकाळी १० वाजता नगर परिषदेच्या एल. टाईप शाॅपिंग सेंटर, सांस्कृतिक केंद्राजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कासम दलवाई यांची निवड
चिपळूण : सरपंच सेवा महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांची निवड करण्यात आली आहे. सरपंचपदाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संघटना आहे. दलवाई यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गोदाम परिसरात खड्डे
मंडणगड : शहरातील शासकीय धान्य गोदाम परिसरातील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांतून पाणी व चिखल साचल्याने त्यातून वाहन गेल्यास चिखल पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे तातडीने हे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.