मंडणगड : काेराेनामुळे भजन, कीर्तन, प्रवचन हे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेच्या मंडणगड शाखेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंडणगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनातील माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे समाजप्रबोधनाचे साप्ताहिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणे अंतर्गत सांप्रदायिक, कीर्तनकार, गायक, मृदुंगाचार्य यांना मदत मिळावी तसेच त्यांच्या नावांची नोंद नसल्याने त्यांच्या नावांची नोंद घेऊन आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वारकरी साहित्य परिषद अंर्तगत महाराष्ट्र सरकार यांच्याकडे तालुक्यातील कलावंतांची यादी सादर करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ह.भ.प. दिनेश पोस्टुरे, आत्माराम सुतार, दगडू बैकर, सुरेश जाधव, योगेश पवार, बाबाजी नालवडे, जनार्दन धाडसे, दिलीप माळी, मंगेश पारदुले, शशिकांत पोस्टुरे यांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.