देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध भागात शिक्षण घेणाऱ्या दहावी - बारावीतील प्रथम तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. देवरूखातील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयाच्या डी. जे. कुलकर्णी सभागृहात कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
वीजवाहिन्या रस्त्यावर
रत्नागिरी : सैतवडे (ता. रत्नागिरी) लेन मोहल्ल्यात दोन दिवसांपूर्वी मोठे झाड कोसळल्याने उच्च दाबाच्या वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. या गावातील संपूर्ण वीजवाहिन्या बदलाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याची दुरवस्था
लांजा : लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भांबेड, कोर्ले, प्रभानवल्ली, खोरनिनको, शिपोशी, कोचरी, वाघणगाव, रिंगणे, व्हेळ, हर्दखळे या गावांमधील रस्त्यांची साइडपट्टी वाहून गेली आहे. रस्त्यावर खडडे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
आपद्ग्रस्तांना मदत
खेड : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या साखरगाव मुंबई आणि ग्रामीण ग्रामस्थांनी २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या पूरबाधितांना मदतीचा हात पुढे केला आहे. पोसरे येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ७० हजार रूपयांची मदत केेली आहे तसेच अन्य बाधितांनाही मदतीचा हात दिला.
डोससाठी धावाधाव
रत्नागिरी : सध्या प्रवास तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाचा प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांची आता मोठ्या प्रमाणावर पळापळ सुरू आहे. मात्र, सध्या लसीचाच साठा अपुरा असल्याने नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.