लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार उडवून दिला आहे. जलदगतीने फैलाव होणाऱ्या या कोरोनाच्या लाटेत अनेक कुटुंब, व्यक्ती बाधित झाल्या आहेत. या लाटेत अनेक महिलांचे पती कोरोनाचे बळी ठरले असल्याने त्यांच्या भाळीचे कुंकू पुसले गेले आहे. त्यामुळे अशा निराधार झालेल्या महिला शासन मदतीकडे आस लावून बसल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ४१,७२१ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी १,४२८ व्यक्ती कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. या मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये कुणाचा मुलगा, मुलगी, पती, पत्नी, आई - वडील आहेत. लहान मुलांचे वडील गेल्याने अनेक मुले आणि त्यांची आई निराधार झाली आहे. त्यामुळे अशांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. या मुलांना शासनाच्या बाल संगोपन योजनेचा आधार मिळणार आहे.
निराधार ६४ महिलांना शासनाच्या मदतीची हाक
कोरोनाने सर्वस्व हिरावून नेल्याने शासनाकडून विविध दुर्बल घटकांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या याचा लाभ अनेक घटक घेत आहेत.
जिल्ह्यातील १३३ मुलांपैकी १२८ मुलांनी वडील गमावले असून, ३ मुलांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले आहे. दोन मुलांचे आई - वडील दोघही गेल्याने ती अनाथ झाली आहेत.
ज्या महिलांचे पती कोरोनाने गेले आहेत, अशा ६४ मातांनी आपल्या मुलांना आर्थिक आधार मिळण्यासाठी शासनाकडे अर्ज केले आहेत.
असा करा अर्ज...
जिल्हा महिला बालकल्याण विभागाकडून अशा निराधार महिलांना तसेच त्यांच्या मुलांना आधार मिळवून देण्यासाठी अर्ज भरून घेतला जातो. मुलांच्या संगोपनासाठी शासनाकडून बाल संगोपन ही योजना जाहीर केली आहे. त्यासाठी पालकाचा अर्ज या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसाठी जोडला जातो. तसेच या महिलेलाही इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज करता येतो.
सध्या जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. तसेच पित्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या आईलाही निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
- समृद्धी वीर, जिल्हा संरक्षण अधिकारी.