रत्नागिरी : महाशिवआघाडीच्या चर्चा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा पालवी फुटली आहे. सद्यस्थितीत सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या उदय सामंत यांचे नाव आघाडीवर असून, शिवसेनेच्या प्रमुख मंत्रीपदांमध्ये त्यांचे नाव असल्याची चर्चा आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणारे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनाही मंत्रीपद मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे.शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होत नाही, हे जसजसे पुढे येत गेले, तसतसा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमधील आनंद मावळला होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर राज्यस्तरावरील घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठका सुरू झाल्या. किमान समान कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता नव्याने शिवसैनिकांमध्ये आशेची पालवी फुलली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेने, तर एका मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या चारपैकी दापोलीचे आमदार योगेश कदम यांची ही पहिलीच निवडणूक आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादीकडून दोनदा आणि आता पाचव्यांदा निवडणूक लढवताना पुन्हा शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रीपदाचा अनुभवही आहे. मात्र, त्यांनी याचवर्षी शिवसनेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे योगेश कदम आणि भास्कर जाधव यांची नावे यावर्षी चर्चेत नाहीत.रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे राष्ट्रवादीकडून दोनदा आणि त्यानंतर शिवसेनेकडून सलग दोनवेळा आमदार झाले आहेत. अल्प काळातच त्यांनी मातोश्रीवर आपले वजन निर्माण केले आहे. त्यामुळे केवळ मंत्रीपदासाठीच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील महत्त्वाच्या मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यातील रत्नागिरीसह अन्य काही मतदार संघांची जबाबदारीही सामंत यांच्यावर सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतही सामंत यांनी दिलेले सर्व प्रकारचे योगदान मोठे होते. त्यामुळे सामंत समर्थकांमधून मंत्रीपदाची खात्री व्यक्त केली जात आहे. राजापूर मतदार संघात विजयाची हॅट्ट्रिक करणारे आमदार राजन साळवी यांच्या समर्थकांनाही मंत्रीपदाची आशा आहे. लोकसभा, विधानसभेतील शिवसेनेचा विजय आणि सलग तिसऱ्यांदा मिळालेली आमदारकी यामुळे त्यांचा दावाही पक्का मानला जात आहे. लवकरच ही नावे जाहीर होतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.पालकमंत्री जिल्हाबाह्यच१९९५ ते ९९ या काळात प्रथम रवींद्र माने आणि नंतर रामदास कदम रत्नागिरीचे पालकमंत्री झाले. १९९९पासून २००९पर्यंत हसन मुश्रीफ, बबनराव पाचपुते, अजित पवार, सुनील तटकरे असे जिल्हाबाह्य पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले होते. २००९ ची पाच वर्षे भास्कर जाधव, उदय सामंत हे पालकमंत्री होते. नंतर पुन्हा हे पद जिल्ह्याबाहेरच गेले.