मनोज मुळ्येनकारात्मक घटनांचे प्रमाण वाढले असले तरी काही माणसे खूप सकारात्मक वृत्तीने पुढे जात असतात. अशा माणसांमुळेच समाज अजून टिकून आहे. त्यात रत्नागिरीतील ‘आशादीप’सारख्या संस्थेचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. दिव्यांग मुलांची निवास व्यवस्था उभी करणाऱ्या आशादीप संस्थेचे हात मात्र अजून सशक्त नाहीत. ज्या कामाचा विचारही आपण करू शकत नाही, असं काम समर्थपणे करणाऱ्या संस्थेला ताकद देण्यासाठी तरी आपण पुढाकार घ्यायला हवा...!
शारीरिक वय वाढलं, पण बौद्धिक वाढ मात्र झाली नाही, अशा दुर्दैवी मुला-मुलींच्या शिक्षणाच्या सोयी काही प्रमाणात उपलब्ध आहेत. पण या सोयींमुळे अशा मुलांची एका ठराविक वयापर्यंत तेही दिवसातले ठराविक तास काळजी घेतली जाऊ शकते. अशा मुलांचे पुढे काय? किंबहुना जोवर आई-वडील हयात आहेत, तोवर ते मायेनं, आपुलकीनं करतील. पुढे काय? अशा मुलांची आयुष्यभराची जबाबदारी कोण घेणार? मन, भावना असलेल्या या मुलांना समजून घेऊन त्यांची आयुष्यभराची देखभाल कोण करणार... असे अनेक प्रश्न ‘त्यां’ना अस्वस्थ करत होते. या अस्वस्थतेतूनच आशेचा एक किरण जन्माला आला... आशादीप. गतिमंद मुलांसाठीची निवासी संस्था. वटवृक्षासारखी वाढणारी. अत्यंत संवेदनशील अध्यक्ष दिलीप रेडकर, ऊन-पावसाची पर्वा न करता देणगीसाठी वणवण करणारे संचालक आणि आईच्या मायेनं मुलांशी वागणारे कर्मचारी या सगळ्या या वटवृक्षाच्या पारंब्या.
साधारणपणे नऊ-दहा वर्षांपूर्वी दिलीप रेडकर यांच्याशी गप्पा झाल्या. परिचय त्या आधीचा. पण त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कँटीनमध्ये भेटलेले दिलीप रेडकर काहीसे वेगळेच होते. आशादीप संस्थेचं काम तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं. या संस्थेची समाजाला गरज का आहे, हे सांगताना रेडकर यांचे डोळे पाणावले. नुसते पाणावलेच नाहीत तर घळाघळा अश्रू वाहत होते, त्यांच्या डोळ्यातून. दिव्यांग मुलांच्या शिक्षणाच्या थोड्याफार सोयी आहेत. पण त्यांच्या निवासाचं काय, हा मोठा प्रश्न आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये निवासाचा एकही उपक्रम नाही. मोठ्या शहरात असे उपक्रम आहेत, पण त्यांची वार्षिक फी सर्वसामान्यांना परवडत नाही. म्हणून आपण खटाटोप करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी म्हणून ग्रामीण भागात अशा अनेक पालकांची त्यांनी भेट घेतली. तिथले अनुभव त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात.
एका अत्यंत वयोवृद्ध जोडप्याची २० वर्षीय मुलगी दिव्यांग आहे. आई-वडील पूर्ण थकले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्याकडे उत्पन्नाचे कसलेही साधन नाही. दिव्यांग मुलगी शेजारीपाजारी धुण्या-भांड्याची कामे करते. त्यावरच त्यांचे घर चालते. अशा मुलीबाबत काही गैरकृत्य घडलं तर? थकलेले का होईना, पण आई-वडिलांचे छत्र आज आहे. उद्याचे काय? या प्रश्नांनी दिलीप रेडकर यांना हलवून टाकलं. आपल्याही अंगावर काटा येतो, हे ऐकून. पण आपण हळहळतो आणि गप्प बसतो. रेडकर गप्प बसले नाहीत. त्यांनी अशा अत्यंत गरीब मुलांनाही सामावून घेतले जाईल, असे काम उभे करण्याचा निश्चय केला. त्यासाठी डॉ. शाश्वत शेरे यांच्या रूपाने देव धावून आला आणि एमआयडीसीत जागा मिळाली, असे रेडकर आवर्जून सांगतात.‘‘आशादीप प्रज्वलीत झाला, तीन मुलांच्या उपस्थितीत. आता इथं २३ मुले आहेत. या मुलांचं आंघोळ, वेणीफणी, खाणं भरवणं सगळंच दुसऱ्यांना करावं लागतं. माझ्या कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून मला मदत केली म्हणून संस्था तग धरून उभी राहिली. अगदी तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी जीव ओतून काम करतात. त्यांना मी जे देतो, त्याला पगार म्हणतानाही लाज वाटते म्हणून मी मानधनच म्हणतो,’’ ही भावना रेडकर यांच्या मनात कायम असते.
अक्षरश: आपलं सगळं घरदार या माणसानं आशेचा दीप प्रज्वलीत राहण्यासाठी दावणीला बांधलं आहे. आपल्याजवळचं आपलं असलेलं या माणसानं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. कोणी एक रूपया दिला तरी तो संस्थेच्याच कामात खर्च होतो, इतक्या प्रामाणिकपणे ते या संस्थेसाठी काम करतात. संस्था उभी राहत नाही, तोपर्यंत देणगीदारही मिळत नाहीत. अशावेळी साथ मिळते ती सर्वसामान्य माणसांची. पण सामान्य माणसं एकाचवेळी भरपूर पैसे देऊ शकत नाहीत. म्हणून रेडकर यांनी एक कल्पना मांडली की, दरमहा १०० रूपये दिलेत तरी चालेल. आमचा संचालक येऊन पैसे घेऊन जाईल. त्यांच्या या कल्पनेला अनेक सामान्य माणसांनी प्रतिसाद दिला आणि अजूनही १०० रूपये दरमहा लोकांकडून आणण्याची प्रथा सुरू आहे. समाजात अनेक वाईट गोष्टी घडत राहतात. पण त्याचबरोबर दिलीप रेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारखे सकारात्मक काम करणारेही खूप आहेत. त्यामुळेच समाज टिकून आहे. म्हणूनच सकारात्मक कामे मार्गी लागत आहेत.
समाजात अशा अनेक संस्था आहेत, ज्यांना सरकारी मदत मिळत नाही आणि कुणा ना कुणा धडपड्या व्यक्तींनी तहानभूक विसरून केलेल्या प्रयत्नांवर त्या उभ्या राहत आहेत. इच्छा असूनही अनेकांना त्यांच्या कामात थेट मदत करता नसेल, तर त्यांना पाठबळ तरी द्यायला हवं. नुसती सहानुभूती वाटण्यापेक्षा त्यांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देण्याची अधिक गरज आहे. तुम्हा-आम्हाला न जमणारं काम करणाऱ्या हातांना उभारी देण्यासाठी, ठोस मदतीसाठी आपण सर्वांनीच पुढे येण्याची गरज आहे. स्वत:च्या उत्पन्नातला अगदी थोडासा वाटा प्रत्येकाने दिला तरी खूप काही घडेल.