शोभना कांबळेरत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात तारकर्लीच्या धर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडी येथे पर्यटकांसाठी लवकरच हाऊसबोट सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती येथील प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी लोकमतला दिली.पर्यटकांना कोकणच्या सागरी किनाऱ्यांचे आकर्षण आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात कोकणात पर्यटकांची गर्दी वाढू लागते. पर्यटकांसाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निवासाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
न्याहरी निवास योजनेमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता बोटसुविधा सुरू केल्या आहेत. गणपतीपुळे, गुहागर, दापोली आदी ठिकाणी बोटिंगची सुविधा असून, पर्यटक या सुविधेचा आनंद मोठ्या प्रमाणावर लुटत असल्याचे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे हाऊसबोट असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. रत्नागिरीतही अशी सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, या उद्देशाने येथील पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यात हाऊसबोट सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. बाणकोट आणि दाभोळ येथे ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय पर्यटन विकास महामंडळाने घेतला आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य कंत्राटदार मिळताच सेवा सुरू करण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.पर्यटकांची संख्या वाढण्यास मदतसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील हाऊसबोटीचे आकर्षण पर्यटकांना होते. त्यामुळे या सुविधेचा आनंद घेण्यासाठी येथील पर्यटक तारकर्ली येथे जात होते. मात्र, आता रत्नागिरीतील दोन ठिकाणी ही सेवा सुरू होणार असल्याने रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना लवकरच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट आणि दाभोळ या ठिकाणी हाऊसबोट सेवा देण्याचा निर्णय प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून, यासाठी दोन हाऊस बोटींची खरेदीही करण्यात आली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, योग्य कंत्राटदार मिळाल्यानंतर लगेचच या बोटसेवेला प्रारंभ होणार आहे.- जगदीश चव्हाण,प्रादेशिक अधिकारी, पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी