चिपळूण : रामपूर विभागात आमदार भास्कर जाधव यांनी अडीच कोटी रुपयांची कामे केली आहेत, अजूनही काही विकासकामे सुरु आहेत, असे असताना दिवस-रात्र काम करणारे आमदार निष्क्रिय कसे? ते शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखांनी पटवून द्यावे, असे आव्हान माजी सभापती जितेंद्र चव्हाण व उपसभापती नंदकिशोर शिर्के यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. मालदोली जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचा मेळावा रामपूर येथे झाला. या मेळाव्यात संपर्कप्रमुख विजय कदम यांनी स्थानिक आमदार जाधव हे निष्क्रिय असल्याचा आरोप केला. याबाबत चव्हाण व शिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ला चढवला.पक्षनेतृत्व आणि निष्ठा काय असते, हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही. आपल्या निष्ठेशी इमान बाळगत या पदाधिकाऱ्यांनी रामपूर विभागात जी कामे केली, त्याबाबत आपण शिवसेनेच्या नेतृत्त्वाबरोबर समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. आमदार दिवस-रात्र या भागाच्या विकासासाठी काम करत आहेत. केवळ आमदार निधीवर अवलंबून न राहता विविध हेडमधून निधी उपलब्ध करून देत आहेत. उलट शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दोन वर्षात या भागात किती विकासकामे केली ते एकदा जाहीर करावे. तुम्ही सक्षम आमदारावर टीका करणार असाल तर आम्ही ते कदापी सहन करणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. आमदार जाधव यांनी मतदारसंघात करोडो रुपयांची विकासकामे केली आहेत आणि त्यांनी केलेल्या विकासकामांबाबत तेथील मतदारही समाधानी आहेत. असे असताना विरोधकांनी उगाचच आरोप करू नयेत. ते खपवून घेतले जाणार नाही, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.या मेळाव्यात राष्ट्रवादी, भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला, असे जाहीर केले आहे. मुळात राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता शिवसेनेत गेलेला नाही, जे काठावर होते, उपरे होते, जे पैसे घेऊन कामे करतात, तेच शिवसेनेत गेल्याचा खुलासा चव्हाण व शिर्के यांनी केला. आमदारांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांचीच कामे जास्त केली आहेत, याचे भान टीकाकारांनी ठेवायला हवे. जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण या आमदारांच्या कामाबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, यातच सारे आले. विकासाचा पुळका असणाऱ्यांनी सत्ता आल्यानंतर घरपट्टीवरील अत्याचाराबाबत एक शब्दही काढला नाही, अशी खिल्ली उडवली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश कातकर, सुरेश साळवी, संतोष गोंधळेकर, प्रमोद कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
करोडोंची कामे करणारे निष्क्रिय कसे?
By admin | Published: March 16, 2016 10:29 PM