लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मोबाईलने व्यक्तीला आता कुठलेच नंबर लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही. याचा प्रत्यय रत्नागिरी शहरात मिळाला. दहापैकी सात नवरोबांना आपल्या पत्नीचा नंबरही आठवत नसल्याचे निदर्शनास आले. याचे स्पष्टीकरण देताना काहींनी बायकोचे एकापेक्षा अधिक नंबर असल्याने कसे लक्षात ठेवणार, असा प्रतिप्रश्न केला. काहींनी नंबर मोबाईलमध्येच सेव्ह आहे तर लक्षात कशाला ठेवायचे असे सांगितले. मात्र, तीनजणांनी न अडखळता नंबर सांगितले. घरात दूरध्वनी असलेल्यांच्या लक्षात मात्र हे नंबर असल्याचे दिसून आले.
शहरातील मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी केलेल्या या रिॲलिटी चेकमध्ये दहापैकी सातजणांना आपल्या बायकोचा नंबर लक्षात नव्हता, तो मोबाईलमध्ये बघून सांगावा लागला. बहुसंख्य बायकांनाही आपल्या नवऱ्याचा नंबर चटकन सांगता आला नाही; परंतु मुलांना मात्र आपल्या आई-वडिलांचे मोबाईल नंबर पाठ होते. विशेष म्हणजे काही मुलांना तर आई-वडिलांचे दोन्ही नंबरही पटकन सांगता आले.
मुलांना आठवते, मोठ्यांना का नाही?
मोबाईलमध्ये असंख्य लोकांचे नंबर संचित करता येतात. त्यामुळे नंबर हवा असेल तर तो आठवण्याचा प्रयास फारसा कुणी करत नाही त्यामुळे तो पटकन आठवतही नाही. मुलांची बुद्धी कुशाग्र असते. या वयात नंबरही चांगले लक्षात राहतात. त्यामुळे मुले आई-वडिलांचे नंबर चटकन सांगतात.
- डॉ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी
लोकमत@रत्नागिरी
- एकाला बायकोचा पहिला नंबर चटकन सांगता आला.
- एकाला बायकोचा एक नंबर सांगता आला, पण दुसरा नंबर मोबाईलवर पहावा लागला.
- एकाला आपला आणि बायकोचा पहिल्यापासून वापरात असलेला नंबर सांगता आला. मात्र, दुसरे नंबर लक्षात राहिलेले नाहीत.
- एकाच्या लक्षात बायकोचे दोन्ही नंबरही होते.
- एकाला बायकोचा नंबर मोबाईल पाहिल्याशिवाय सांगताच येईना.
- एकाने एवढे नंबर असतात, लक्षात कसे रहाणार? मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, तर बुद्धीला ताण कशाला द्या, असे सांगून विषय झटकला.
- एका वृद्ध व्यक्तीला बायकोचा नंबर लक्षात नव्हता, पण मुलाचा नंबर लक्षात होता.
- एका प्रौढ व्यक्तीच्या लक्षात बायकोचा नंबर नव्हता, पण मुलीचा नंबर सांगता आला.