जेव्हा नदीच्या परिसरात पाऊस पडण्याचे प्रमाण वाढते, त्यावेळी नदीला पूर येतो व पाण्याचा लोंढा नदीपात्राच्या बाहेर येऊन शेती तसेच मानवी वस्तीवर अतिक्रमण करतो. त्यामुळे शेतीचे तसेच मालमत्तेचे नुकसान होते. यावर्षी जुलै महिन्याच्या २२-२३ तारखेला चिपळूण, खेड, महाड येथे पूर आले. वाशिष्ठी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्यावेळी विविध ठिकाणी पडलेल्या पावसाचे मापन झालेले नाही. परंतु, महसूल विभागातर्फे तालुका स्तरावर झालेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये उपलब्ध आहे, ती खालीलप्रमाणे आढळते.
काही प्रसंगी कमी वेळामध्ये जो जोरदार पाऊस पडतो, त्यामुळे नुकसान जास्त होते. तशी प्रत्येक तासाची आकडेवारी दुर्दैवाने उपलब्ध नाही. परंतु, आपल्याला वरील पाऊसमानावरून दिसून येईल की, दि. २२/०७ व २३/०७ या दोन दिवशी आदल्या दिवसाच्या किंवा नंतरच्या दिवसापेक्षा जवळजवळ दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे पूर आले. कारण हा पाऊस कोयना खोऱ्याच्या २,२३,००० हेक्टर एकूण पाणलोट क्षेत्रात पडला आहे. कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेल्या पावसाबरोबरच खेड तालुक्यातून जगबुडी नदीतून येणारे पाणी चिपळूण शहराच्या उत्तरेकडील तीरावर वाशिष्ठी नदीला मिळते. त्यामुळे जगबुडी व वाशिष्ठी या दोन नद्यांच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी एकत्र मिळाले. त्यामुळे हे फुगलेले पाणी चिपळूण परिसरात पसरले. चिपळूण शहर हे पूर्वी तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते. परंतु, ते तलाव बुजवून तेथे आता नवनवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याला सामावून घ्यायला जागा उपलब्ध नव्हती. या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. परंतु, यातून लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे. या पुरामुळे जीवितहानी, पशु-पक्ष्यांची (कोंबड्या) हानी, मालमत्तेची हानी झाली आहे. यावर्षी चिपळूणची बाजारपेठ पाण्याखाली आल्याने व्यापारीवर्गाचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. त्याशिवाय चिखल स्वरूपात जी लाखो टन माती सह्याद्रीच्या डोंगरावरून आली आहे त्याचा आपण नैसर्गिक संपत्ती म्हणून कधी विचारच करत नाही. निसर्गामध्ये १ इंच मातीचा थर तयार होण्याला साधारण ४५० ते ५०० वर्षे लागतात. हे लक्षात घेतले तर सुपीक जमिनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज आपण सगळीकडे चिखल झाल्याने दुकानातील ज्या मालाचे व घरातील कपडे-लत्त्यांचे, भांड्या-कुंड्याचे नुकसान झाले आहे त्याचाच विचार करतोय. शेतीला अत्यंत उपयोगी असा हा मातीचा थर पुरामुळे वाहून जातो. कोकणातील जमीन जी आधीच कमी सुपिकतेची आहे ती जास्त निकृष्ट होत आहे, याचाही विचार पुराच्या परिणामामध्ये केला गेला पाहिजे.
फार मोठ्या प्रमाणात कमी वेळामध्ये पडणाऱ्या पावसावर आज तरी आपण निर्बंध घालू शकत नाही. त्याचा अभ्यास आपल्या देशामध्ये तसेच इतर अनेक देशांमध्ये, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये चालू आहे. त्यामध्ये जागतिक तापमानात होणारी वाढ हा प्रामुख्याने कळीचा मुद्दा आहे. तूर्त तरी चिपळूण शहरामध्ये येणारे पुराचे पाणी कमी करण्याच्या दृष्टीने शीघ्रगतीने काम करणे आवश्यक आहे.