लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात लसीचा पुरवठा अपुरा असल्याने जिल्ह्यातील ८३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आतापर्यंत देण्यात आला आहे. मात्र, ४० टक्के कर्मचारी अजूनही दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य क्षेत्रातील डाॅक्क्टर्स आणि कर्मचारी यांचे लसीकरण १०० टक्के होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात १२,६३६ आरोग्य क्षेत्रातील डाॅक्टर आणि अन्य कर्मचारी यांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १८,०१७ जणांना लस देण्यात आली आहे. फ्रंट लाइन वर्कर यांचे लसीकरण उद्दिष्टापेक्षाही अधिक झाले असून आतापर्यंत १०७ टक्के कर्मचाऱ्यांना पहिला आणि ५५ टक्के कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
लसीकरणाबाबत अजूनही उदासीनता
-१६ जानेवारी २०२१ पासून सर्वत्र लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील डाॅक्टर्स आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली.
- सुरुवातीला शासनाकडून आलेल्या यादीनुसार लस देण्यात येत होती. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी डोसच नाकारल्याने सुरुवातीला लस वाया गेली.
- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच १ मार्चपासून ज्येष्ठ आणि कोमाॅर्बीड या व्यक्तींनाही लसीकरणाचा निर्णय शासनाने घेतला.
- कोरोना संसर्ग रोखण्यात प्रतिकारशक्ती महत्त्वाची असून त्यासाठी लस प्रभावी आहे. मात्र, सध्या लसीचा साठाच अपुरा पडू लागला आहे तर काहींना अजूनही त्याचे गांभीर्य नसल्याने काही आरोग्य कर्मचारी लस नाकारत आहेत.
सुरुवातीला शासनाकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्यात आली होती. मात्र, काहींनी त्या यादीत नाव असूनही लस घेण्यासाठी नकार दिला होता. मात्र, त्यानंतर कोरोना वाढू लागताच लस घेणे आवश्यक असल्याचे सर्वांनाच वाटू लागले. त्यामुळे पहिला डोस ८३ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, तर दुसरा डोस ५४ टक्के जणांनी घेतला आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांनीही दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
- डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी