रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे दिसल्यावर काही दिवसांतच आजाराची तीव्रता वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. अशा वेळी एचआरसीटीची चाचणी करून त्वरित आजाराचे स्वरूप व तीव्रता जाणून घेणे गरजेचे झाले आहे, जेणेकरून रुग्णांचे विभाजन वा उपचार वेळेत सुरू होतील, अशी माहिती रत्नागिरीतील रेडिओलॉजिस्ट प्राईम डायगनोस्टिक सेंटरच्या डाॅ. तरन्नुम खलिफे यांनी दिली.
तरन्नुम खलिफे यांनी सांगितले की, एचआरसीटी चाचणीत क्ष-किरणे व संगणकीय प्रणालीचा वापर करून छातीच्या आत असलेले विविध अवयवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, विविध कोनातून अनेक प्रतिमा घेतल्या जातात. सिटीस्कॅनमध्ये क्ष-किरणांचा प्रवाह हा छातीभोवती गोलाकार पद्धतीने प्रचंड गतीने फिरून, वेगवेगळ्या प्रतिमांचे कट (स्लाईस) तयार केले जातात. त्यांच्यावर संगणकाच्या माध्यमातून प्रोसेसिंग करून मॉनिटरवर अवलोकन करून तपासणी अहवाल हा प्रशिक्षित डॉक्टरांकडून केला जातो. या प्रतिमा नेहमीच्या छातीच्या एक्स - रे पेक्षा जास्त अचूक असतात.
फुफ्फुसाचा किती टक्के भाग संसर्गित झाला आहे हे चाचणी करून, कोरॅड-स्कोअरद्वारे अचूक कळते. हा स्कोअर एक ते आठ असेल, तर सौम्य आठ ते १५ असेल, तर मध्यम (मॉडरेट) आणि १५ पेक्षा जास्त असेल तर तीव्र आजार असण्याची शक्यता असते. एचआरसीटी चाचणी ही कोरोनासाठी अचूक निदान करणारी चाचणी असल्याचे डाॅ. खलिफे यांनी म्हटले आहे.
कोरोनाची लागण जर फुफ्फुसापर्यंत पोहोचली तर एचआरसीटी तपासणीमध्ये आजारी फुफ्फुसात विशेष असे फिक्या व ग्रे रंगाचे पट्टे दिसतात. ज्याला ‘ग्राउंड ग्लास ऑपॅसिटी’ असे म्हणतात. हे पट्टे पारदर्शक असतात अर्थात या पट्ट्यांच्या मागे असलेला फुफ्फुसाचा उरलेला भाग, रक्तवाहिनी, सूक्ष्म श्वासनलिका स्पष्टपणे दिसतात. कोरोना आहे की नाही आहे याची शक्यता ही चाचणी पडताळून पाहते. त्याचबरोबर फुफ्फुसाचा किती भाग कोरोनाने ग्रासलेला आहे, त्याचीही माहिती मिळते. त्यामुळे आजाराचे लवकर निदान हाेऊन वेळेवर उपचार हाेणे साेपे हाेते, असे डाॅ. खलिफे यांनी सांगितले.