सागर पाटील
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सर्वच विभागीय मंडळांमध्ये निकालाची लगबग सुरू असून, निकाल वेळीच जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रवारी महिन्यांत राज्यात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षां घेण्यात आल्या होत्या. कला, शास्त्र, वाणिज्य व व्होकेशनल शाखांमधून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी उत्तर पुस्तिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. यामुळे अनेक उत्तर पुस्तिका उशिरापर्यंत तपासल्या गेल्या नाहीत.या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गतवर्षी राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी हा निकाल ५ जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या अनुषंगाने विविध निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे उत्तर पुस्तिका तपासण्यास उशीर झाला असल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे.३३ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ३३६४७ विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसले होते. कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून राज्यात सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा या वर्षीदेखील कायम राहील, असा विश्वास विभागातून व्यक्त केला जात आहे.