रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी रविवारी (7 एप्रिल) मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार केला आहे. लोगो तयार करून मतदानाचा संदेश देताना एक विक्रम घडवला आहे असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर विविध शाळा महाविद्यालयांमधील २८०० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांनी मानवी साखळी द्वारे हा लोगो तयार केला आहे. नेत्रदीपक अशा या सोहळयाच्या निमित्ताने स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार जागृतीचा एक कार्यक्रम सादर करण्यात आला. शिस्तबद्ध रित्या शाळकरी मुले आणि मुलींनी मैदानावर आयोगाचा लोगो साकारला आहे. हा उपक्रम बघण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते.
स्वीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाची भव्यता साधारण कॅमेऱ्यात न मावणारी होती, त्यामुळे प्रशासनातर्फे याच्या चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वांसोबत जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी देखील मानवी साखळीत सामील झाले होते.
कार्यक्रमात सेंट थॉमसच्या बँडने सुरेल धून कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. पथनाट्याचे सादरीकरण यावेळी झाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोअर कमिटी करण्यात आली होती. या कमिटीत मंदार सावंत, संध्या सावंत, रुपेश पंगेरकर, इम्तियाज शेख, किरण जोशी, कृष्णा गावडे, नाना पाटील, निलेश पावसकर, विनोद मयेकर, शशिकांत कदम, राजेंद्र कांबळे, आगा सर, विश्वेश टिकेकर ढवळे यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व उपस्थितींना मतदाराची शपथ दिली. दीड तास चाललेल्या या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता वंदे मातरमने झाली.