खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी व जमावबंदी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लाकूड माफियांनी शेकडो झाडांची कत्तल सुरू केली आहे. मात्र, बेलगाम वृक्षतोड रोखण्याची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांचेच या कामाला पाठबळ असल्याचा आराेप करण्यात येत आहे.
तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील खासगी जागेतील आंबा, फणस, आईन, किंजळ, साग आदी किमती झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडल्या प्रकरणी मंदा गंगाराम फावरे यांनी वनविभागासह पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.
तालुक्यातील कळंबणी गावात दंडवाडी, पार्वतीचा माळ या भागात असलेल्या वडिलोपार्जित सर्व्हे क्रमांक ६२/१४, २/४, ५०/६, ७, १० तसेच ४८/२३, २४, २५ व २८ या जमिनीत असलेली सुमारे ४० ते ५० वर्षे वयोगटातील मौल्यवान व किमती झाडे अज्ञातांनी जमीनमालकांची परवानगी न घेता तोडून त्याची परस्पर विक्री केल्याचा दावा मंदा फावरे यांनी केला आहे. या तक्रारीच्या प्रतिपोलीस निरीक्षक, तहसीलदार व प्रांत कार्यालयात देण्यात आल्या आहेत. मात्र तक्रार करूनही वनविभागाचे अधिकारी मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.
‘डायरेक्टर जनरल इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट ट्री रिसर्च ॲण्ड एज्युकेशन’च्या अहवालानुसार, एका झाडाचे सरासरी वय ५० वर्षे असते. तसेच एक झाड ५० वर्षांत ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऑक्सिजन देते. याच कालावधीत एक झाड २३ लाख ६८ हजार ४०० रुपये मूल्याचे वायू प्रदूषण नियंत्रित करते, १९ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे मृदा संरक्षण, उर्वरकता संवर्धन करते, पावसाचे पाणी अडविणे, जलचक्र चालविणे यात चार लाख ३७ हजार रुपये किमतीचे योगदान देते. अशा पद्धतीने एक झाड ५० वर्षांत मानवाला ५२ लाख ४०० रुपयांहून अधिक किमतीच्या सेवासुविधा उपलब्ध करून देते, तर दुसरीकडे लाकूड माफिया मात्र निसर्ग उद्ध्वस्त करतानाच गरीब शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी साधन असलेल्या वृक्ष संपदेची लूट करत आहे. कळंबणी येथील माझ्या जमिनीत बेसुमार वृक्षतोड करून माझे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने दाद मागण्याचा इशारा मंदा फावरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसोबत बोलताना दिला आहे.
प्राणवायू देणाऱ्यांची कत्तल
कोरोनाकाळात एक बाजूला प्राणवायू ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित होत असताना दुसरीकडे तो मोफत उपलब्ध करून देणाऱ्या झाडांवर निर्दयीपणे स्वतःच्या स्वार्थासाठी कुऱ्हाड चालविली जात आहे. मात्र, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात चालढकल करण्यात संबंधित अधिकारी धन्यता मानत आहेत.
-- khed_photo81 खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील खासगी मालकीच्या जमिनीतील झाडे विनापरवाना तोडण्यात आली आहेत.