देवरुख : कोरोनामुळे संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानही बंद आहे. यामुळे भाविकही इकडे फिरकले नाहीत, ना व्यापारी. त्यामुळे मार्लेश्वर क्षेत्री वावरत असणाऱ्या वानरांचे फार हाल झाले. या प्राणिमात्रांवर दया दाखवत देवरुखमधील खालची आळीतील तरुणांनी या वानरांना पुरेसा खाऊ नेऊन खायला दिले.
देवरुखखालच्या आळीत राहणारे युवक सुरेश करंडे, संदेश सुवारे, मनोज कदम, निखिल चव्हाण, वंश गुरव यांनी मार्लेश्वर येथे जाऊन या वानरांना खाद्य पुरवले. केळी, पाव, चुरमुरे, भाकरी, पोळी आदी साहित्य या वानरांसाठी नेले होते. अनेक दिवसांनंतर असे खाणे मिळाल्यामुळे वानरांनीही अगदी जवळ येऊन हे खाणे खाल्ले. सुमारे ४० वानरांना या युवकांनी खाणे दिले. काेराेनामुळे मार्लेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे याठिकाणची दुकानेही बंद आहेत़ भाविकांनीही पाठ फिरवली आहे़ सारेच बंद असल्याने मार्लेश्वर येथील वानर काय खात असतील, ते उपाशीपोटी राहत असतील, असा विचार आल्यानेच आम्ही हा उपक्रम राबवल्याचे सुरेश करंडे यांनी सांगितले.
-------------------------
संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील भुकेलेल्या वानरांसाठी देवरुखातील तरुणांनी खाऊ नेला हाेता़