मेहरून नाकाडे
रत्नागिरी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या सोहळ्याचा वापर केला. त्यामुळेच वीस पेक्षा अधिक श्री सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. या सरकारमधील एकही मंत्री मृत श्री सदस्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी केला नाही. या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे, मात्र खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी भर दुपारी खुल्या मैदानात राज्य सरकारने सोहळा आयोजित केला गेला. या सोहळ्याला उपस्थित तीनशेपेक्षा अधिक श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊन वीसपेक्षा अधिक श्री सदस्यांचा नाहक बळी गेला. हवामान खात्याने तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असतानाही भर दुपारी सोहळा आयोजित करून राज्य सरकारने श्री सदस्यांचे प्राण घेतले आहेत. कोटयावधी रुपये खर्च पुरस्कार वितरणासाठी करण्यात आला, तर मग मंडप का उभारला नाही? मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांचे मृत्यू होणे ही गंभीर बाब असून घटनेस कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.
वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे कामाची गती आता मंदावली आहे. निधी संपला असून गाळ पूर्णतः काढण्यात यश आलेले नाही. तर जगबुडी खाडीतील गाळ तसेच कोयनानगर धरणातील गाळ काढण्याची मागणी दलवाई यांनी केली. चिपळूण कराड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. परशुराम घाटातील खोद कामामुळे भविष्यात मंदिराला धोका असल्याचे अभियंत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत मार्ग काढावा अशी सूचना केली. तर आंबा बागायतदारांना झाडामागे नुकसान भरपाई देत काजूला १६० रुपये हमीभाव देण्याची मागणी दलवाई यांनी केली. यावेळी महिला प्रदेशच्या सरचिटणीस रूपाली सावंत, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष हरिष शेकासन, शहराध्यक्ष रमेश शहा, भरत लब्धे , सुरेश पाथरे उपस्थित होते.