मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी स्पर्धेत नाही, असे ठाम विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये केले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून अधिकाधिक मताधिक्य आपण देऊ, असे सांगतानाच भाजप म्हणून आम्ही या मतदार संघावर दावा करत असल्याचेही ते म्हणाले.
रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या मुद्द्यावर पूर्णपणे पडदा टाकला. लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही. पक्षाने कडाळ - मालवण मतदार संघाची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. तेथून अधिकाधिक मताधिक्य देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितलेली नाही. आपण इच्छुक नसल्याचेही आपण पक्षाला सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.या मतदार संघासाठी पक्ष म्हणून आम्ही दावा करत आहोत, ही बाब खरी आहे. कारण चिपळूण ते बांदा या भागात भाजपाची ताकद अधिक आहे. त्यामुळे भाजपाला ही जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. स्वत:साठी नाही, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रत्येक मुद्द्याचा विचार करुन कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निकाल दिला आहे. त्यामुळे त्याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला तरी काही उपयोग होणार नाही, असे ते म्हणाले.ठाकरे त्याच दिवशी हरले.
मुख्यमंत्री म्हणून विश्वासदर्शक ठरावाला उद्ध्व ठाकरे सामोरे गेले नाहीत, तेथेच ते हरले आहेत. त्यांनी या ठरावाला सामोरे जाणे आवश्यक होते. मात्र ते धाडस त्यांच्याकडे नाही. आता निकाल सहन होत नाही म्हणून त्यांचा तळतळाट होतो, अशी टीकाही नीलेश राणे यांनी केली.