चिपळूण : चिपळूण संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेची हक्काची मते असून उमेदवार सहजपणे निवडून येईल, इतकी मोठी ताकद आहे. तरीदेखील पक्षाला चिपळूण विधानसभा मतदार संघ मिळाला नाही. याला वरीष्ठ पातळीवरील राजकीय तडजोडी कारणीभूत असून त्याविषयी आमची नाराजी आहे. मात्र असे असले तरी महायुती म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना पुर्णपणे पाठींबा असून त्यांचे झटून काम करणार असल्याची माहिती माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हे चिपळूण विधानसभा मतदार संघातून इच्छूक होते. एवढेच नव्हे तर पक्षाच्या दोनवेळा झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यातही याविषयीची जोरदार मागणी पक्ष निरीक्षकांसमोर केली होती. त्यानंतर चव्हाण यांना गुहागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. आचारसंहितेच्या तोंडावर चव्हाण यांनी मुंबईत पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. मात्र आता त्यांची संधी हुकल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. अशातच सोमवारी चव्हाण हे शेखर निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आवर्जुन उपस्थित राहीले.
यावेळी त्यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, चिपळूण मतदार संघातून उमेदवारी मिळावी, ही सुरवातीपासून आपली इच्छा होती. त्यानंतर पक्षाने गुहागरमधून उमेदवारीबाबत विचारणा केली. त्याप्रमाणे आपण पक्षाला तयारीही दर्शवली होती. परंतू आता मतदार संघात शिवसेनेची ताकद असतानाही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असणे साहजिकच आहे. परंतू आता महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता सर्व ताकदीनीशी उतरून निकम यांच्या प्रचारात योगदान देणार आहे. निकम यांची अर्ज दाखल करतानाची मिरवणूक ज्या पद्धतीने निघाली, त्याचा अर्थ निकम यांचा विजय निश्चीत आहे. त्यापद्धतीने यापुढेही शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करताना दिसेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.