संदीप बांद्रेचिपळूण : गेली चार महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाची प्रक्रिया अहोरात्र सुरू असली, तरी आजही चिपळूण पूरमुक्त झाल्याचा दावा कोणीही करू शकणार नाही. यावर्षीही महापुराच्या शक्यतेने नागरिकांनी आतापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाळ्याचे चार महिने ‘तळमजला नको रे बाबा, उंचावरची खोली भाड्याने द्या’, अशी विनवणी काहीजण करू लागले आहेत. अशा परिस्थितीत खोली व सदनिकेची भाडेवाढ झाल्याने अनेकांची कोंडी होऊ लागली आहे.चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुराने चिपळूणकरांचे हाेत्याचे नव्हते झाले. या घटनेला आता जवळजवळ वर्ष होत आले असले, तरी या प्रसंगातून अनेक कुटुंबे सावरलेली नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागल्याने नदीकाठावरील नागरिकांसह शहरातील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काहींनी तर पावसाळ्याचे चार महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी खोली अथवा सदनिका भाड्याने घेण्यासाठी शोध सुरू केला आहे.
चिपळूण शहरातील ९० टक्के भाग हा महापुराने व्यापला होता. त्यामुळे केवळ १० टक्के भाग सुरक्षित राहिला आहे. त्यामुळे शहरातील रावतळे, मतेवाडी, ओझरवाडी, शिवाजीनगर, पागझरी या सुरक्षित भागात नागरिक स्थलांतरित होत आहेत. त्याशिवाय शहरालगतच्या कापसाळ, मिरजोळी, शिरळ, वालोपे, पेढे या ठिकाणी तात्पुरत्या वास्तव्यासाठी काहींनी चौकशी सुरू केली आहे. या परिस्थितीमुळे सुरक्षित व उंच ठिकाणी असलेल्या भागातील खोली व सदनिकांचे भाड्याचे दर वाढू लागले आहेत.या भागात पूर्वी प्रति महिना २ हजार रुपये भाड्याने मिळणारी खोली आता साडेतीन ते चार हजार रुपये, तर सदनिका ५ ते ६ हजार रुपये इतके भाडेदर वाढले आहे. मात्र, आता भाडेवाढ करुन लूट सुरु आहे.त्यातही आतापर्यंत काढलेल्या गाळामुळे चिपळूण पूरमुक्त होईल याची शाश्वती कोणी देण्यास तयार नाही. त्याशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ उपसा अशक्य आहे. या कालावधीत किनाऱ्यावरील गाळ उचलणेही कठीण बनले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही महापुराविषयी भीतीचे वातावरण कायम असून, ते पावसाळ्यात सुरक्षित निवारा शोधू लागले आहेत.गाळ वस्तीत शिरणार?अजूनही शहरातील वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. परंतु, प्रशासनाने गाळ उपशासाठी निश्चित केलेले साडेसात लाख घनमीटरचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यातच अनेक ठिकाणी गाळ किनाऱ्यावर असल्याने तो महापुराच्या वेळी नदीपात्रात किंवा नजीकच्या वस्तीत वाहून जाण्याची चिन्हे आहेत.