गुहागर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादीला लाचार म्हणणारी भाजप राष्ट्रवादीबरोबर जाते की स्वतःच्या बळावर निवडणुका लढवते, हे पाहायचे आहे. या निवडणुकीत भाजपची ताकद मला बघायचीच आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला. राज्यात आघाडी सरकार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आमच्यासोबत आली तर स्वागतच आहे, असे खुले आव्हान त्यांनी दिले़
गुहागर तालुक्यातील पालशेत जिल्हा परिषद गटातील शिवसेना मेळावा पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृह येथे आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी भास्कर जाधव बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, नेत्रा ठाकूर, सचिन जाधव, अमरदीप परचुरे, अनंत चव्हाण उपस्थित होते.
भास्कर जाधव म्हणाले, निवडणुकीमध्ये असे काम करा की लोकांना तुम्ही आपले वाटले पाहिजेत. आपला विकास करेल तो नेता व तो पक्ष त्यांनाच निवडून दिले पाहिजे, असे ते म्हणाले. तालुक्याला माझ्या रूपाने पहिल्यांदा मंत्रिपद व मुलाच्या रूपाने अध्यक्षपद मिळाले. असे असताना ‘हतबल मातोश्री, लाचार राष्ट्रवादी’ अशी खोचक टीका करणाऱ्यांनी एवढे चांगले बदल मोठ्या मनाने स्वीकारायला हवे होते, असा टोला विनय नातूंचे नाव न घेता लगावला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, ज्या दिवशी अध्यक्षपदावरून खाली येईन तेव्हा तालुक्यासाठी मी चांगले काम केले, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, असे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, सुनील पवार, पांडुरंग कापले, पूर्वी निमुणकर, विलास वाघे, नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक मुळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक यांनी प्रास्ताविक केले. पाटपन्हाळे सरपंच संजय पवार यांनी आभार मानले.
नवीन पदाधिकारी निवड
तालुक्यातील काही पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका सहसचिवपदी शरद साळवी (खोडदे), सचिवपदी विलास गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आबलोली उपतालुका प्रमुखपदी विलास वाघे व काशीराम मोहिते यांची निवड जाहीर करण्यात आली.
पक्षांतर्गत वादावर टाेचले कान
पक्षात चांगले काम करतो आहे त्याला मानाचे पान मिळणार. पक्षात जुना - नवा वाद खपवून घेणार नाही. मी सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. ‘आलास तर बस पाटावर, नाहीतर जा घाटावर’ अशा कडक शब्दांत पक्षांतर्गत जुन्या - नव्या वादावर कार्यकर्त्यांना सुनावले.
भाजपच्या नादाला लागलेले लयास गेले
अजूनपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळात पगारवाढ झालेली नाही. ही प्रथमच झाली आहे. तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत. भाजपच्या नादाला लागू नका. नादाला लागले ते लयास गेले, असे भास्कर जाधव यांनी एसटी संपाबाबत बाेलताना सुनावले.