रत्नागिरी : डाॅमिनाेजवरून ऑनलाइन आईस्क्रीमची ऑर्डर दिल्यानंतर बँकेच्या खात्यातून ६३ हजार २०५ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार रत्नागिरीत शुक्रवारी रात्री ९.३७ वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पाेलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सुहास शंकर विध्वंस (५५, रा. दत्तात्रय अपार्टमेंट, फाटक हायस्कूल, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री त्यांनी डॉमिनोजवरून ऑनलाइन आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती. थोड्या वेळाने त्यांना अज्ञाताने फोन करून फोन टू एसएमएस ॲप डाऊनलोड करण्यास सांगितला. त्यानंतर माेबाइलवर आलेला ओटीपी नंबर मागून घेतला. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून ६३,२०५ रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुहास विध्वंस यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.