चिपळूण : शिक्षण हे केवळ व्यक्तीला साक्षर बनविण्यासाठी नसून सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस घडविणे यासाठी आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुली व महिलांनी शिकून पुढे जायला पाहिजे. तरच समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रविवारी येथे व्यक्त केला.विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचलित विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल मौजे शिरळ येथे उभारण्यात येणाऱ्या विद्याभारती शिक्षण संकुलाचा भूमिपूजन सोहळा व शिरळ वाचनालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार हुसेन दलवाई, शिरळच्या सरपंच फरिदा पिंपळकर, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू उपस्थित होते. यावेळी लोकसभा अध्यक्ष महाजन म्हणाल्या की, तरुण मुला-मुलींनी शिकले पाहिजे. पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर समाजासाठी चांगले काम करून आदर्श नागरिक बनले पाहिजे. कोणताही प्रकल्प उभा करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गंगाजली निर्माण करा. हे वाचनालय तुमच्यासाठी आहे. गावागावांमध्ये वाचनालय निर्माण झाली पाहिजेत. त्यामुळे संस्कारमय पिढी घडू शकते. लोकसभेमध्ये काम करताना तेथील काही आठवणी महाजन यांनी सांगितल्या. लोकसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा मानला जात नाही. तेथे काम करताना सगळ्यांचे सहकार्य चांगले मिळते, असे यावेळी सांगितले.
मुस्लिम मुली शिकल्या तर समाज जागरूक होर्ईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:20 PM