राजापूर :
वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर प्रखर विरोधी भूमिका घेणाऱ्या मनसेने पुन्हा एकदा विद्युत वितरण विभागाविरोधात नव्याने संघर्षाचा निर्धार केला आहे. ज्या विद्युत ग्राहकांच्या जमिनीतून वीजखांब किंवा लाईन गेली आहे, त्या ग्राहकांना त्यांच्या जमिनींचा मोबदला जोवर दिला जात नाही, तोवर ते ग्राहक वीजबिल भरणार नाही. त्यांना वीजबिल माफ केले पाहिजे, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्याचा प्रयत्न संबंधित वितरण विभागाने केल्यास मनसेस्टाईल आंदोलन करीत त्यांची कार्यालये तोडू, असा इशारा मनसेचे राजापूर तालुकाध्यक्ष राजेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजेश पवार यांनी सांगितले की, गेले वर्षभर कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. मात्र, विद्युत वितरण विभागाने विजेचे दर वाढवून विद्युत ग्राहकांना जोरदार ‘शॉक’ दिला आहे. वाढीव बिलांबाबत मनसेने जिल्ह्यात मागील काही महिन्यांत आंदोलने केली आहेत. मनसे विजेच्या प्रश्नावर जनतेसाेबत आहे.
वाढीव वीजबिलांच्या आंदोलनानंतर मनसेने पुन्हा एकदा विद्युत वितरणविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ज्या विद्युत ग्राहकांच्या जमिनींमधून विजेचे खांब यासह लाईन गेल्या आहेत. त्या ग्राहकांची परवानगी न घेता संबंधित वितरण विभागाने आपल्या मर्जीने ते वीजखांब टाकले आहेत. त्याचा मोबदला संबंधित ग्राहकांना दिलेला नाही, अशा ग्राहकांना विजेचे बिल माफ केले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
जोपर्यंत आमच्या जमिनींचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत वीजबिल भरायचे नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या विद्युत ग्राहकांच्या जमिनीतून वीजखांब किंवा लाईन गेली आहे अशा ग्राहकाचे वीजबिल माफ झालेच पाहिजे. तालुक्यातील त्या सर्व ग्राहकांनी आपल्या जमिनींच्या सातबारासह तालुका मनसे कार्यालयाशी किंवा मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष राजेश पवार यांनी केले आहे.