शोभना कांबळे -- रत्नागिरी --मुले आज टी. व्ही.ची शिकार होत आहेत. गावापेक्षा शहरी भागात हे प्रमाण जास्त आहे. असं असलं तरीही पालक आणि शिक्षक प्रबळ असतील तर ही मुले वाचनाकडे नक्कीच वळतील, त्यासाठी मुलांच्या कलानी आणि अंगानी जाणारा सकारात्मक दृष्टीकोन हवा, असा आशावाद राजापूर येथील ज्येष्ठ बालसाहित्यिक मदन हजेरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.बालपुस्तकदिनाच्या अनुषंगाने ते बोलत होते. राजापूर तालुक्यात ३५ वाचनालयांसोबतच कोकण मराठी साहित्य परिषद, राजापूर शाखेच्या सहकार्याने ११ वाचनालये सुरू करण्याचे श्रेय सर्वस्वी हजेरी यांना जाते. मुलांसाठी १९८२ सालापासून ते विविध उपक्रम राबवत आहेत. त्यामुळेच येथील बालवाचन संस्कृती खऱ्या अर्थाने विकसित झाली आहे. १९८२ साली मदन हजेरी यांनी जानशी (ता. राजापूर) येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना बालसाहित्याची निर्मिती करण्यास प्रारंभ केला. तत्पूर्वी त्यांनी १९८१ साली लहानू ही किशोर कादंबरी लिहिली होती. १९८८ साली राजापूरनगरवाचनालयाच्या संचालकपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी या नगरवाचनालयाच्या माध्यमातून दहा वर्षे केवळ मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यास प्रारंभ केला. राजापूर शहर परिसरातील तीन शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. मुलांना चांगली पुस्तके वाचायला देऊन त्यावर चर्चा घडवून आणल्याने या मुलांचे वाचन सुधारले, त्यांना पुस्तक ओळख होऊ लागली. त्याचदरम्यान हजारे यांनी मुलांसाठी ‘आपडीथापडी’ वार्षिकांक सुरू केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सन १९९९ पासून राजापूर नगरवाचनालयाच्या माध्यमातून बालविकास प्रकल्प सुरू झाला आहे. त्याच्या माध्यमातून विविध उपक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने राबविले जात आहेत. क्रांतिकारकांच्या वेशभूषेत स्वातंत्र्यदिनी भाषण करणे, प्रत्यक्ष नदीकिनारी मुलांना नेवून निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्याकडून चित्र काढून घेणे, कथाकथन, निबंध स्पर्धा, पाठांतर, लेखन स्पर्धा यातूनच बालसाहित्यिक निर्माण होत आहेत. निसर्ग सहलींचे आयोजन केल्याने मुलांना पशुपक्ष्यांची ओळख होण्यास मदत होते. वर्षातून असे आगळेवेगळे १२ उपक्रम नगरवाचनालय बालविभागाच्या बालविकास प्रकल्पांतर्गत राबविले जात असल्याची माहितीही हजेरी यांनी दिली. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत मुलांसाठी विविध चित्रपट दाखवले जातात. आम्ही मुलांना पुस्तके वाचायला देतो, त्यात नवरसांचा समावेश असतो. त्यातून त्यांना ज्ञान व्हावे, हा मुख्य उद्देश असतो. कथावाचनातूनही नवरसाचे ज्ञान मिळत असल्याने ही मुले चाणाक्ष झाली आहेत. म्हणूनच त्यांना भाषेचा अडसर होत नसल्याचे हजेरी यांनी सांगितले.बालसाहित्याबाबत बोलताना हजेरी म्हणाले की, सर्व प्रकारची मिळून साधारणत: २२०० ते २५०० इतकी मराठी पुस्तके येतात. त्यापैकी जास्तीत जास्त ३०० बालसाहित्य प्रकाशित होतात. पण, त्यातील बहुतांश बिरबल, पंचतंत्र, इसापनीती अशी जुनीच पुस्तके असतात. दीड वर्षापासून काही ठराविक प्रकाशकांची अनुवादित मुलांसाठीची चांगली पुस्तके यायला लागल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ती मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. कारण अजूनही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बालसाहित्याची दुकानेच नाहीत. मुलांच्या पुस्तकांची किंमत कमी असल्याने दुकानदार व्यावहारिक दृष्टीकोनातून विक्रीस ठेवण्यास तयार होत नाहीत. याबाबत पालकांनीही जागरूक होऊन आपली दृष्टी बदलायला हवी, असे मत हजेरी यांनी व्यक्त केले. याबाबत केरळचे उदाहरण देताना ते म्हणाले की, केरळ शास्त्र संशोधन संस्थेने घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केल्याने केरळमध्ये प्रत्येक घरात अगदी चार मासिके व अन्य पुस्तके दिसतात. आपल्याकडील पालकांनी आणि शिक्षकांनीही असा प्रयत्न करायला हवा, असे आग्रही मत हजेरी मांडतात.1बालविकास प्रकल्पांतर्गत या मुलांना घेऊन २००४ साली ‘बोलगाणी’ हा कार्यक्रम तयार करण्यात आला. यात मंगेश पाडगावकर यांच्यापासून ते अगदी नवोदित कवींच्या प्रसिद्ध गाण्यांचा समावेश होता. याचे सूत्रसंचालनही मुलांनीच केले. हा कार्यक्रम रत्नागिरीत झालाच, त्याचबरोबर कोल्हापुरातही त्याचे कौतुुक झाले.2राजापूर नगरवाचनालय आणि कोमसापच्या शाखेतर्फे तालुक्यात ११ बालग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. बालग्रंथालयाला दिवंगत बालसाहित्यिकाचे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर बालविभागाला आता हक्काची १००० चौरसफुटाची जागा मिळाली आहे. त्याचे उद्घाटन येत्या मे महिन्यात बालचित्रपट महोत्सवाने होणार आहे. 3मुलांनी वाचलेल्या पुस्तकांवर लिहिलेल्या समीक्षेचे पुस्तक ‘बालसाहित्य आकलन आणि समीक्षा’ या नावाने प्रसिद्ध केले आहे. मुलांच्या अंगाने लिहिलेली ही पहिलीच समीक्षा आहे. या पुस्तकाला रत्नागिरीबरोबरच अन्य जिल्ह्यातूनही पसंती मिळाली आहे. सध्या त्यांनी मुलांसाठी ‘खेळगडी’ हे त्रैमासिक सुरू केले आहे, असे मदन हजेरी यांनी सांगितले.
शिक्षक प्रबळ असतील तर मुले नक्कीच वाचनाकडे वळतील
By admin | Published: April 01, 2016 10:46 PM