पवार कुटुंब एकत्र आल्यास तो दिवस भाग्याचा, आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:08 PM2024-06-10T13:08:00+5:302024-06-10T13:08:20+5:30

'उमेदवारी मिळाली नाही तरी बेहत्तर; पण हे कुटुंब एकत्र यायला हवे'

If the Pawar family comes together it is a lucky day says MLA Shekhar Nikam | पवार कुटुंब एकत्र आल्यास तो दिवस भाग्याचा, आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केलं मत

पवार कुटुंब एकत्र आल्यास तो दिवस भाग्याचा, आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केलं मत

चिपळूण : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, असे बोलले जाते. गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणातून हेच स्पष्ट झालेय. खरे तर राजकारणात कशालाच ‘व्हॅल्यू’ नसते; पण कुटुंब हे कुटुंबच असत आणि पवार कुटुंब हे वेगळ्या पद्धतीचे कुटुंब आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या आधी एकत्र आले, तर तो दिवस आमच्या भाग्याचा असेल, अशी प्रतिक्रिया चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त सुनील तटकरे यांच्या विजयाच्या माध्यमातून कोकणने साथ दिली. त्यापलीकडे फारसे यश आले नाही. मात्र, आता या लोकसभा निवडणुका होताच पवार कुटुंब विधानसभा निवडणुकीआधी एकत्र येतील का, असा सवाल त्यांच्या समर्थकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांना छेडण्यात आले.

ते म्हणाले की, राजकारणात आज, उद्या आणि परवा नेमके काय घडणार आहे, ते कोणीच सांगू शकत नाही. वर्षभरापूर्वी मी शरद पवार यांना सोडून पक्षांतर करीन, असे कोणी म्हटले असते, तर मीच त्याला वेड्यात काढले असते. कारण पवार ‘फॅमिली’ मी अगदी जवळून पाहिली आहे. हे कुटुंब पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचे आहे. त्यांच्यातील ‘फॅमिली रिलेशन’ बिघडले असले, तरी ते एकत्र आले तर तो दिवस आमच्यासाठी आयुष्यात भाग्याचा असेल. अगदी एकत्र आले मग पक्षात आलेल्यांचे काय होईल, असे जर कोणाला वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी बेहत्तर; पण हे कुटुंब एकत्र यायला हवे.

राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी कायम घडत असतात; परंतु त्यामध्ये आपले वैयक्तिक नाही; पण जनतेचे नुकसान किती होणार याचेही भान ठेवायला हवे. अजून बरीच कामे करायची आहेत. काम झाली पाहिजेत त्यासाठीच हा संघर्ष सुरू आहे. दादा कामाला हवा; पण निवडणुकीला फायदा नाही म्हणून सोडा, असे मुळीच होणार नाही. अशा शब्दांत निकम यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

Web Title: If the Pawar family comes together it is a lucky day says MLA Shekhar Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.