रत्नागिरी : शीळ धरणावरील नवीन जॅकवेल दीड महिन्यापूर्वी झाले असताना पाणी पुरवठा सुरू का केला नाही? नियोजनशुन्य कारभारामुळे शहरावर पाणी संकट असून जो पाणी पुरवठा होतो त्यामध्ये पक्षीय राजकारण सुरू आहे. पाण्यात पक्षपातीपणा केला, तर नगर परिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी आणि पाणी अभियंत्यांना दिला आहे.शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून अनेक भागात चार-चार दिवस पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून ठाकरे शिवसेनेने नगर परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्ष मोर्चा दिसला नाही. काही ठराविक पदाधिकारी थेट वाहनांवरून नगर परिषदेवर धडकले. तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, महिला पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केले. नगर परिषदेत आलेनंतर मुख्याधिकारी तुषार बाबर दालनात नसल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळात मुख्याधिकारी आल्यानंतर सर्व पदाधिकारी त्यांच्या दालनात गेले. यावेळी पाणी अभियंता अविनाश भोईर व अन्य कर्मचाऱी समवेत होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. यावर नगर परिषदेने काय नियोजन केले? ठेकेदाराने यात दिरंगाई केली असेल तर त्यांच्यावर फाैजदारी दाखल करा. परंतु जनतेला पाण्यापासून वंचित ठेऊ नका. पाण्याच्या नियोजनासाठी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. आम्हाला का नाही बोलावले?
आजपासून प्रत्येक प्रभागात १ अशा १६ टॅंकरचे नियोजन करा. त्याची पुर्ण माहिती शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांना द्यावी. यावर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आम्ही तसे नियोजन करून तुम्हाला माहिती देतो, असे सांगितले. मात्र जर तसे झाले नाही, तर नगरपरिषदेला कुलुप ठोकू, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असा इशारा यावेळी शिवसेनेने दिला.