चिपळूण : केंद्रीय मंत्रिपदाचा बुरखा घालून नारायण राणे यांच्यात जे काही भूत संचारले होते, ते एका दिवसात निघून गेले आहे. आता जनाची नाही तर मनाची राखत खरा स्वाभिमान असेल, तर त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा द्यावा, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी येथे लगावला.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मंगळवारी त्याचे जोरदार पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली जनआशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून भाजप-शिवसेना आमने-सामने आली. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. बुधवारी खासदार राऊत चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राणे यांना झालेली अटक कायदेशीर असल्याचे सांगितले. या देशाचा कायदा किती भक्कम आहे, हे या कारवाईतून सिद्ध झाले आहे. सर्वसामान्यांपासून वरच्यांपर्यंत कायदा समान असून, तो कोणालाही वठणीवर आणू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने निर्माण केलेला कायदा देशाच्या सर्वसामान्यांचे रक्षण करणारा आहे, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.
राणे हे चिपळूण दौऱ्यावर आले असताना स्वातंत्र्य दिनाला वर्धापनदिन म्हणाले, म्हणजे काय डोकं आहे, ते पाहा. शिवसेनेला भिडल्यानंतर त्याचा शेवट काय होतो, हे आता उघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण लेखी स्वरूपात राणे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. त्याची मोदी यांनी गंभीर दखल घेतली व अमित शहा यांच्याशी बोलावे, असे कळवले. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक होते, यावरूनच त्यांनी जनाची नाही तर मनाची राखत स्वतःहून पदाचा राजीनामा द्यायला हवा, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.