शोभना कांबळेरत्नागिरी : वाहतुकीचे नियम विविध कारणांनी मोडणाऱ्या चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कारवाईच्या कचाट्यात सापडणाऱ्या चालकावर आता कारवाईचे संदेश अगदी मोबाईलवरही येत आहे. वाहतूक शाखेने जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभरात विविध प्रकारच्या १ लाख १२ हजार ३५३ जणांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी १७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या टीमने जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाईला प्रारंभ केला आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या १ लाख १२ हजार ३५३ इतक्या कारवाई करून त्यातून दंड वसूल केला आहे.या कारवाईत विनाहेल्मेट, विना सीटबेल्ट, धोकादायक स्पीड, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, रेड सिग्नल तोडणे, विना इन्शुरन्स, विना परवाना, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, प्रवेश निषिद्ध असलेल्या मार्गावरून गाडी नेणे, ट्रिपल सीट नेणे, म्युझिकल हॉर्न, आदी अन्य बाबींचा समावेश आहे. मात्र, काहीवेळा पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून अनेकजण दुर्लक्ष करतात.तर वाहनपरवाना रद्द...लाल सिग्नल तोडला, मोबाईलवर संभाषण तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास त्या चालकावर दंडात्मक कारवाई करतानाच त्याचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो.
वाहनचालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे. अनेक अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होत असतात. त्यामुळे काही वेळा समोरच्याच्या अपघाताला कारणीभूत होतो.शिरीष सासने, पोलीस निरीक्षक