रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळेत समुद्रकिनारी अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. अशा वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचे पत्रही पाठविण्यात आले आहे.
रामपूर ग्रामीण रुग्णालय
चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यासंदर्भात गेली अनेक वर्षे होत असलेल्या मागणीला आणि त्यासाठी सुरु असलेल्या आमदार भास्कर जाधवांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सोमवारी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे.
ग्राहक त्रस्त
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. यात बीएसएनएलच्या मुख्य लाईन तुटल्याने संगमेश्वर तालुक्यामध्ये २२ तास रेंज गायब झाली आहे. शनिवारी परचुरी-कोळंबे दरम्यान माती वाहून गेली व दगडीही कलंडल्या. यामुळे बीएसएनएलची मुख्य लाईन तुटल्याने सेवा खंडित झाली होती. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर नेटवर्क पूर्ववत झाले.
पर्यटनाला बंदी
खेड : रघुवीर घाटात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. या पार्श्वभूमीवर रघुवीर घाटात पुढील महिनाभर पर्यटनास जाण्यास बंदी घालण्यात आली असून, तसे आदेश प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने यांनी सोमवारी जारी केले आहेत.
मास्क, सॅनिटायझर वाटप
खेड : तालुक्यातील कर्टेल गावात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याचेवळी ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी परिसरात वृक्षारोपणही केले. याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सरपंच दिनेश चव्हाण, ॲड. दिलीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण, मनोहर चव्हाण, राजेश पवार व अन्य उपस्थित होते.
दापोली-मुंबई शिवशाही बस सुरु
दापोली : लॉकडाऊननंतर दापोली आगारातून ग्रामीणसह जिल्ह्यात, परजिल्ह्यात बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये लांबच्या प्रवासात लोकप्रिय ठरलेली दापोली-मुंबई शिवशाही बसही मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. ही बस दापोलीतून सकाळी १० वाजता मुंबईकडे जाण्यासाठी सुटणार आहे तर मुंबईतून रात्री ९ वाजता सुटणार आहे.