घरातून बाहेर पडलं की उजव्या अंगाला सगळी भाताची शेती. डाव्या अंगांनी सरळ वाटेने वरच्या अंगाने जायचं मग लागतो मांड किंवा दत्ताचे देऊळ. त्याला वळसा घालून रेल्वेच्या रुळावरुन उजवीकडे चालायला लागलं की समुद्राची गाज ऐकायला येते. कोपऱ्यात दिसते काणेकरचे दुकान. फळीवर दिसतात थंड झालेली कांद्याची भजी आणि बरणीत ठेवलले खदखडे लाडू. २ - ४ रिकामे लोक चहाच्या निमित्ताने उभे असतात. तसेच पुढे पाच-दहा मिनिटे चालत गेलं की होते सागर दर्शन. समुद्राचा सुक्या मासळीचा वास, खारा वारा, क्षितिजापर्यंत पसरलेली निळाई, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा बघून मन भारावून जाते.
माझे बालपण याच गावात गेले, माझी नाळ या गावाशी जोडलेली आहे. बालपणी या मोकळ्या हवेत मनसोक्त हुंदडायला, बागडायला मिळालं हे माझे भाग्यच. शालेय शिक्षणासाठी मला मुंबईला पाठवण्यात आलं. हिरव्यागार कोंदणात असलेल्या घरातून माझी रवानगी मुंबईच्या चाळीत झाली. मुंबईला ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ म्हणतात ते उगाच नाही. मुंबई तुम्हाला आमुलाग्र बदलून टाकते. तुमच्या मनात नवीन आशा उमलतात, डोळ्यात नवीन स्वप्ने उतरू लागतात. करिअरची घोडदौड सुरू झाली. इंजिनिअर होऊन एका प्रतिथयश कंपनीत नोकरी मिळाली, तेव्हा तर जग जिंकल्याचा आनंद झाला. मुंबईतल्या मुलीशीच लग्न झाले. कौटुंबिक, कार्यालयीन जबाबदाऱ्या वाढायला लागल्या. कामामध्ये पूर्णपणे झोकून दिले. यशाच्या पायऱ्या चढत गेलो. स्वतःच्या घरात लवकरच पदार्पण केलं. एकामागून एक स्वप्न पूर्ण होत होती. मी आता पक्का मुंबईकर झालो.
कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभरात फिरणे झाले. कोकणापासून कलिफॉर्नियापर्यंत प्रवास झाला. परदेशातील गगनचुंबी इमारती, समृद्धी, तेथील जीवनशैली, भव्य मॉल्स, पोटातील पाणी पण हलणार नाही असे रस्ते, हे सगळं छानच आहे, पण मी त्याने भारावून नाही गेलो. अनुभवाच्या, जाणीवेच्या कक्षा विस्तारत गेल्या. निरनिराळ्या प्रदेशातील लोकांचे आचार-विचार, त्यांची जीवनपद्धती, त्यांची घरे, चालीरिती यांची ओळख झाली. मुंबईमध्ये कामाचा व्याप खूप वाढल्याने गावी वर्षातून फक्त एकदा-दोनदा जाणं होतं. मुंबईच्या गॅलरीमधून दिसणारे चांदणे बघून कधी कधी वाटतं,
‘किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’
आंबा, फणसाचा वास आला की गावाची आठवण येत राहते. गाव बोलावत आहे, असे वाटत राहते.
गेल्यावर्षी अमेरिकेला सनहोजे येथे मुलीच्या घरी गेलो होतो. येथे तिचा स्वतःचा मोठा आलिशान बंगला बघून, केलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी मात्र मुंबईची, घराची आठवण यायला लागली. ‘लेकीकडे जाईन, तूपरोटी खाईन’ असं म्हणत सुरू केलेला मुक्काम संपला आणि मी मुंबईला परतलो. मुंबईमध्ये पोहोचल्याबरोबर मुंबईचे ट्रॅफिक, गोंगाट, प्रदूषण, गर्दी, वास येताच मला घरी आल्याचा आनंद झाला.
आजकाल जेव्हा मी माझ्या जीवन प्रवासाबद्दल विचार करतो, तेव्हा मी अधांतरी असल्याची भावना आहे. मुंबई माझी कर्मभूमी. मुंबईत कमावलेले नाव आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, वाढवलेला पसारा आहे. सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेलं आणि आनंदी कुटुंब असलेले स्वीट होम आहे. मुंबईतील सुखसुविधा, दिमतीला कार, टोलेजंग मॉल, फोन करताच कोणतीही वस्तू घरपोच मागविण्याची सुविधा, उत्तम मेडिकल सेवा यामुळे मुंबई माझा कम्फर्ट झोन आहे. मध्यंतरी आईचे मोठे ऑपरेशन झाले. मुंबईमध्ये असल्यानेच तिचे ऑपरेशन यशस्वी झाले, याची जाणीव आहे. गेले पन्नास वर्ष मुंबईने मला जे हवे ते सर्व दिले आहे.
मात्र वेडे मन ओढ घेते गावाकडे. मुंबईच्या मानाने गावी सुविधा कमी आहेत. शहरीकरण झालेले नाही. लोडशेडींग असते. मोबाईलला रेंज नसते, तरीही आनंदात राहता येते. अशा अनेक गोष्टी आहेत. तरीसुद्धा माझे मन गावीच रमते. मी याच मातीतला याची प्रकर्षाने जाणीव होते. गड्या आपुला गाव बरा...
- डॉ. मिलिंद दळवी, तळेगाव, मालवण