विलास यशवंत शेंडगे (शिक्षक, रत्नागिरी नगर परिषद)
सध्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे मानवाचे संपूर्ण जीवनच कठीण झाले आहे.
याचाच एक भाग म्हणून कोविड योद्धा म्हणून माझी नेमणूक आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकात केली होती. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची अँटिजन टेस्ट केली जात होती. लोक टेस्टसाठी गेले नसते तर या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असता; परंतु फिरत्या पथकामुळे ब्रेक द चेन यासाठी खूप मोठी मदत होणार आहे.
आमच्या फिरत्या पथकातील डॉ. मोहन सातव हे खूपच सकारात्मक होते. त्यांच्या सोबत राहून पॉझिटिव्ह लोकांचे प्रबोधन करून त्यांना काळजी घेण्यास सांगत होतो. समाजातील सर्व स्तरातील लोकांची टेस्ट करणे व ब्रेक द चेन या मोहिमेंतर्गत प्रत्येक व्यक्तीने नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटक पूर्ण ताकदीनिशी कार्य करत आहेत.
पहिल्या दिवशी अँटिजन टेस्ट करताना घाबरणारे लोक दुसऱ्या दिवसापासून केंद्रावर स्वतःहून येत होते. आता लोकांच्या मनात कोविडसंदर्भात असणारे गैरसमज हळूहळू कमी होताना दिसत आहेत. सर्वांनी जबाबदारीने वागून काळजी घेतल्यास आपण सर्व जण महामारीतून मुक्त होऊ शकतो. गरज आहे ती सर्वांनी मिळून सकारात्मक विचार करण्याची व प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची.
समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून समाजहितासाठी प्रयत्न केले आणि आपल्याला शक्य असेल तेवढी मदत केल्यास आपल्याला या महामारीतून बाहेर पडण्यास मदत होईल.
जमेल ज्यांना जसे जसे
त्यांनी योगदान देऊ या !
आलेला व्हायरस हद्पार करू या
चला कोरोनामुक्त भारत करू या.