रत्नागिरी, दि. १३ : राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी तत्काळ बंद करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत केली. राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असताना, विधान भवन व मंत्रालय आस्थापनाला बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करण्याबाबत विनाविलंब आदेश काढावेत, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ैपॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून विधान परिषदेच्या सभापतींचे लक्ष वेधत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ैैकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी देशातील काही खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडील विभाग, निमशासकीय विभाग, खाजगी आस्थापना, बँक आदी क्षेत्रात बायोमेट्रीक हजेरी न लावण्याबाबत आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने बायोमेट्रिक हजेरी न घेण्यासाठी शासन निर्णय जारी करावा.''
दरम्यान, राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील लोकसंख्या लक्षात घेता कोरोनाचा फटका हजारो नागरिकांना बसू शकतो. जगभरात सध्या कोरोनामुळे घबराट पसरलेली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाविरोधात जगाने एकजूट होऊन लढण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.