पाली : ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटविलेली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा. प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
निवळी ते लांजा नगरपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पाली ग्रामपंचायत सभागृहात झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी, विभागप्रमुख तात्या सावंत, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, पाली गावचे मुख्य मानकरी अभियंता संतोष सावंतदेसाई, पाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच वरील भागातील गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवळी ते लांजा विभागातील महामार्गावरील बाधित गावांच्या सरपंच व ग्रामस्थांनी चौपदरीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या अडचणींविषयी उदय सामंत यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्या सर्व तक्रारी ऐकून मंत्री सामंत यांनी तत्काळ त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तेथेच निराकरण करून घेतले. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली. काहींकडून ती न मिळाल्याने त्यांना योग्य ती समज देण्यात आली व तत्काळ कारवाई करून या तक्रारींचे निराकरण करण्याचे फर्मान सोडले.
भूसंपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाइपलाइनचे काम प्राधान्याने सुरू करावे. या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच पूर्ण करावे. ग्रामस्थांच्या भूसंपादनाबाबत तक्रार असेल, तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करणे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक लाइनचे पोल योग्य अंतरावर आहेत का, याचे सर्वेक्षण करून स्ट्रीट लाइटची सर्व्हिस लाइन टाकून घ्यावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.
निवळी तारवेवाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रकरणी अंडरपास करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. अनेक ठिकाणी महामार्गामुळे गाव दोन भागांत विभागल्याने शेतीवाडी, रहदारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा निवळी रावणंगवाडी, तारवेवाडी, पाली, खानू, मठ, आंजणारी, वेरळ, आयटीआय लांजा, वाकेड या ठिकाणी अंडरपास रस्त्याचे नियोजन करावे. ज्यांनी मोबदला घेऊनही आपली बांधकामे हटवली नाहीत, अशी बांधकामे तत्काळ हटवा, अशी सूचनाही त्यांनी केली. पाली तिठ्यावरील शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात नियोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.