लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता ग्रामीण जिल्हा वार्षिक योजनेतील कोविड-१९च्या ३० टक्के निधीमधून ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे कोविड हॉस्पिटल किंवा डीसीएचसी तत्काळ सुरू करण्याची मागणी राजन साळवी यांनी केली. खासदार विनायक राऊत तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी केली.
या बैठकीमध्ये आमदार राजन साळवी यांनी राजापूर व लांजा तालुक्यांमध्ये शासनाच्या मालकीचे कोविड हॉस्पिटल किंवा डीसीएचसी नसल्याचे सांगितले. तसेच दिलेल्या मान्यतेनुसार ओणी येथे शासकीय इमारतीमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू होत असून, त्यांची मर्यादा २५ बेडची आहे. असे स्पष्ट करीत ग्रामीण भागात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता व ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणामध्ये येण्याकरिता रायपाटण ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल किंवा डीसीएचसी सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले. त्याठिकाणी ४० बेडचे हॉस्पिटल होऊन, त्यामध्ये १५ बेड हे व्हेंटीलेटर आय.सी.यू व २५ बेड ऑक्सिजनसाठी तत्काळ उपलब्ध व्हावेत. तसेच या हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात यावा, अशी मागणी केली. आमदार राजन साळवी यांनी केलेल्या मागणीला खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सहमती दर्शविली.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक किरण सामंत उपस्थित होते.
..............................
तालुक्यात वाढती रुग्णसंख्या
राजापूर तालुक्यात वेगाने काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबराेबर मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. तालुक्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे आराेग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड्सही कमी पडत असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामध्ये बराच वेळ लागत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासही वेळ लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अन्य काेविड हाॅस्पिटल उभारणे गरजेचे आहे.