रत्नागिरी : जम्मू - काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत जिल्ह्यातील पर्यटक अथवा इतर कामासाठी गेलेले आपले नातेवाईक, मित्रमंडळी अडकले असल्यास त्यांची माहिती प्रशासनाला त्वरित द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.उत्तराखंड येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीवेळी मंत्रालयातर्फे मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आला होता. त्यावेळी जिल्ह्यातून उत्तराखंडला गेलेल्या अनेक व्यक्तींपर्यंत मदत पोहोचणे शक्य झाले होते. सध्या जम्मू - काश्मीरमध्ये पूरस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. याहीवेळी राज्याचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणी व्यक्ती या ठिकाणी गेलेली असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची माहिती दिल्यास त्यांना मदत करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधितांनी जम्मू - काश्मीरमध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव, वय, लिंग, पत्ता, शेवटच्या वेळी संबंधित व्यक्तीसोबत संपर्क झालेले ठिकाण आणि दिनांक, सद्यपरिस्थिती, व्यक्तिचा संपर्क क्रमांक, व्यक्तिची माहिती देणाऱ्या नातेवाईकाचे नाव व मोबाईल क्रमांक याबाबींची माहिती संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, स्थानिक पोलीस अथवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी केले आहे.नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. त्यामुळे अशी माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी ०२३५२ - २२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १०७७ या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्तीत जी माहिती कळेल त्यांनी त्वरित संबंधित विभागाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
जम्मू येथे अडकलेल्यांची त्वरित माहिती द्या
By admin | Published: September 11, 2014 10:17 PM