रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. रस्त्यावर विनाकारण नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रत्नागिरी विभागातून गुरुवारी चार हजारांपैकी अवघ्या २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्याने २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लाॅकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न निम्म्यावर आले आहे.
वीकेंडमुळे गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारी दोन दिवसांत जेमतेम २६१ फेऱ्या धावल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. २४ लाख सहा हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस. टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा रत्नागिरी विभागाला लाॅकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.
रत्नागिरी विभागात एकूण ६०० बसेस असून, ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वा दोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते. गुरुवारी दिवसभरात २२२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. ४५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने २३ लाखांचे उत्पन्न लाभले.
लांब पल्ल्याच्या गाड्या बंद
मुंबई मार्गावर दिवसभरात शंभर गाड्या रत्नागिरी विभागातून धावतात. मात्र, दापोली व खेड आगारांतून अवघ्या दोन गाड्या मुंबई मार्गावर धावल्या असल्या तरी अन्य आगारांतून मुंबई मार्गावरील फेऱ्या शंभर टक्के बंद होत्या. कोल्हापूर मार्गावर दिवसभरात १६ फेऱ्या धावतात. मात्र, सध्या सांगलीवगळता अन्य सर्व गाड्या बंद आहेत.
........................
लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवासी भारमान पुरेसे लाभत नसल्याने शहरी, तसेच ग्रामीण व लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन संबंधित मार्गावरील बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत.
- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.