रत्नागिरी : राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र २०२१साठीचे प्रवेश सुरू होणार आहेत. दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणालीतून हे प्रवेश करण्यात येणार आहेत.
सध्या आयटीआयमध्ये ९१ विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जात आहे. या व्यवसायांचा अभ्यासक्रम उद्योगांशी संबंधित आहे. तो उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनीच विकसित केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेट देणे, उद्योगधंद्यातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. सध्या शिकवण्यात येत असलेल्या एकूण ९१ शाखांपैकी ८० शाखांचे प्रवेश दहावीच्या गुणांवर तर ११ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे.
सर्व प्रवेश ऑनलाईनच होणार आहेत. प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रवेश कार्यपध्दती पुस्तिका लवकरच संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने आवाहन केले आहे. प्रवेशाचे वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.